Maharashtra Political Crisis : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल आता येत्या काही तासांतच समोर येणार आहे. सर्वोच्च न्यायलयात याप्रकरणी पाच सदस्यांच्या घटनापीठासमोर सुनावणी पूर्ण झाली असून निकाल राखून ठेवला होता. आता हा निकाल आज जाहीर होणार आहे. त्याआधीच अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही याप्रकरणी एक भन्नाट प्रतिक्रिया दिली आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर अनेक आमदार त्यांच्यासोबत गेले होते. सुरत, गुवाहाटी आणि मग गोव्यात या आमदारांना ठेवण्यात आलं होतं. दरम्यान, शहाजी बापू पाटील सुद्धा शिंदे गटात सामिल झाले. यावेळी त्यांचा एक डायलॉग संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाला होता. गुवाहाटीच्या निसर्गसौंदर्यासंदर्भातील त्यांचं हे वाक्य होतं. एका कार्यकर्त्याने त्यांच्या चौकशीकरता त्यांना फोन केला होता. त्यावेळी काय झाडी, काय डोंगार, सगळं ओक्के आहे, असं शहाजी बापू पाटील आपल्या कार्यकर्त्याला म्हणाले होते. त्यांचा हा ऑडिओ क्लिप तुफान व्हायरल झाला. त्यांचा हा डायलॉग इतका गाजला की, एखाद्या सेलिब्रिटीप्रमाणे त्यांना त्यानंतर तो डायलॉग अनेकवेळा उच्चारायलाही सांगितला.

हेही वाचा >> Maharashtra Political Crisis: अजित पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “मला वाटतंय कदाचित…!”

आज सत्तासंघर्षाचा निकाल लागणार आहे. अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष सर्वोच्च न्यायालयाकडे असणार आहे. यासंदर्भात लाईव्ह लॉ या न्यायालयातील माहिती पुरवणाऱ्या संकेतस्थळाने माहिती दिली होती. त्यांचं हेच ट्वीट करत संजय राऊतांनी रिट्वीट केलं आहे. “काय झाडी ,काय डोंगर, काय हिरवळ, आज वाट पाहतोय तुमची, नरहरी झिरवळ.. जय महाराष्ट्र!” असं संजय राऊत ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सर्वोच्च न्यायालयात आज राज्यातील सत्तासंघर्षावर निकाल येणार आहे. शिंदे गटातील १६ आमदार पात्र की अपात्र? विधानसभा अध्यक्षांची नियुक्ती वैध की अवैध? विधानसभा उपाध्यक्षांविरोधातील अविश्वास ठरावाचं पुढे काय? किंवा राज्यपालांनी बहुमत चाचणीचा दिलेला आदेश योग्य की अयोग्य? यासंदर्भात आज न्यायालायकडून निर्णय किंवा टिप्पणी येणं अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊतांचं हे ट्वीट महत्त्वाचं आहे.