राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या नाराजीनाट्यावरून मागील चार दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधील ४० आमदारांसह भाजपा पाठिंबा देतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. यानंतर अजित पवारांनी प्रसारमाध्यमांसमोर येऊन या सर्व चर्चांवर पडदा टाकला आहे. जिवात जीव असेपर्यंत आपण राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच काम करणार, असं स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिलं.

यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली. भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं ‘ऑपरेशन लोटस’ मी उधळून लावलं, असं विधान संजय राऊत यांनी केलं. राऊतांच्या या विधानाला शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊतांना केवळ उद्धव ठाकरे सहन करू शकतात, अजित पवार त्यांना सहन करून घेणार नाहीत, अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली. ते मुंबई येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

हेही वाचा- “अजित पवारांची स्क्रिप्ट भाजपानं लिहिली”, फडणवीसांचं नाव घेत सुषमा अंधारेंचं टीकास्र!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संजय राऊतांच्या विधानाबद्दल उपरोधिक टोलेबाजी करताना संजय शिरसाट म्हणाले, “संजय राऊत यांनी जे विधान केलं आहे, ते अत्यंत बरोबर आहे. संजय राऊत हा स्वत:च्या बापालाही घाबरत नव्हता. संजय राऊतांनी महाविकास आघाडी सरकार बुडवण्याचं काम पूर्ण केलं आहे. यातही उद्धव ठाकरे यांची शिवसेना बुडवण्याचं कामही त्यांनी केलं. आता संजय राऊतांनी अजित पवारांशी पंगा घेतला आहे. उद्धव ठाकरे हेच संजय राऊतांना सहन करू शकतात पण अजित पवार त्यांना सहन करणार नाहीत. अजित पवार संजय राऊतांना तातडीने योग्य ते उत्तर देतील, अशी माझी अपेक्षा आहे.”