राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडल्यापासून शरद पवार यांच्या गटातील आमदार रोहित पवार हे सातत्याने आक्रमक होत राज्य सरकारला धारेवर धरत आहेत. अशातच रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो या कंपनीवर राज्य सरकारकडून कारवाई सुरू झाल्याचं समोर आलं आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने रोहित पवारांशी संबंधित बारामती अॅग्रो या कंपनीला नोटीस पाठवली आहे. या नोटीशीद्वारे बारामती अॅग्रोचे दोन प्लान्ट बंद करण्याची सूचना करण्यात आली आहे. दरम्यान, दोन मोठ्या नेत्यांच्या सांगण्यावरून ही कारवाई केली असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, या कारवाईबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. शरद पवार यांनी काही वेळापूर्वी बारामती येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी शरद पवार यांना रोहित पवारांच्या कंपनीवरील कारवाईबाबत प्रश्न विचारला. त्यावर शरद पवार म्हणाले, मी त्यावर उत्तर देऊ इच्छित नाही.
शरद पवार यांनी रोहित पवार यांच्या कंपनीवरील कारवाईबाबत प्रतिक्रिया देणं टाळल्यामुळे वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आहे. यावर आता राजकीय प्रतिक्रियादेखील येऊ लागल्या आहेत. दरम्यान, शिवसेनेच्या शिंदे गटाचे प्रवक्ते आणि आमदार संजय शिरसाट म्हणाले, शरद पवार यांना परिणामाची कल्पना असल्यामुळेच त्यांनी याविषयी बोलणं टाळलं.
हे ही वाचा >> “…तेव्हा उबाठा गटाचे सैनिक बच्चे होते”, मराठी पाट्यांच्या मुद्यावरून मनसेचा टोला
आमदार संजय शिरसाट म्हणाले, ते शरद पवार आहेत, त्यांनाही माहिती आहे की या कारवाईमध्ये काय दडलंय? याप्रकरणी पुढे होणारे परिणाम शरद पवार यांना माहिती असावेत म्हणूनच त्यांनी याविषयी बोलणं टाळलं. यावर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी शिरसाट यांना विचारलं की, नेमके काय परिणाम होणार आहेत? त्यावर संजय शिरसाट म्हणाले, ते परिणाम शरद पवारांना माहिती असतील. मी काही शरद पवारांइतका मोठा नेता नाही. त्यामुळे मला त्याबद्दल माहिती नाही. शरद पवारांना परिणामांची जाणीव असल्याने त्यांनी याविषयी बोलणं टाळलं.