सांगली : शेतकऱ्यांच्या बुट्टीत आज भाकरी नाही, त्यामुळे सध्याच्या घडीला मदत मिळायला हवी. कर्जमाफीचा निर्णय जून २०२६ पर्यंत घेतला जाईल, असे मुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस यांनी सांगितले असले, तरी तोपर्यंत कर्जवसुलीस तत्काळ स्थगिती मिळायला हवी, अशी मागणी माजी खासदार संजयकाका पाटील यांनी शुक्रवारी केली आहे.

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करून त्यांचा सातबारा कोरा करा यासह अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ मदत मिळावी, या मागणीसाठी शुक्रवारी माजी खासदार पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसाचे उपोषण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.

ते म्हणाले, ‘सांगली जिल्ह्यामध्ये सध्या अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीमुळे शेती व शेतीपिकाचे अतोनात नुकसान झालेले आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला असून, त्याचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले आहे. अशा वेळी सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून त्यांचा ७/१२ कोरा करणे हाच एकमेव पर्याय राहिलेला आहे. राज्य शासनाने वेळकाढूपणा न करता लवकरात लवकर सरसकट कर्जमाफीबाबत निर्णय घ्यावा.

गेल्या काही वर्षांपासून सततच्या नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वेळोवेळी नुकसानीला सामोरे जावे लागलेले आहे. शेती करताना शेतकरी सोसायटी, पतपेढ्या व बँकांमधून कर्जे घेत असतात, परंतु शेती पिकांच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचे उत्पन्न न मिळाल्यामुळे त्यांना कर्ज फेडणे शक्य होत नाही. सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची हीच अवस्था असल्याने त्यांना या गोष्टीचा नाहक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल आहे. शेतीपिकाचे नुकसान होऊनही कर्जवसुलीकरिता शेतकऱ्यांवर दबाव टाकला जातो. अशा बऱ्याच घटना घडलेल्या आहेत. यावर उपाय म्हणून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन त्यांचा सातबारा कोरा करणे हाच एकमेव पर्याय शेतकरी हिताचा आहे.

शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयाबाबतचा अहवाल शासनस्तरावरील समितीकडून लवकरात लवकर प्राप्त करून त्यावर मार्च २०२६ च्या आधी कार्यवाही करण्यात यावी. जेणेकरून बँका, पतसंस्था, सोसायट्या यांचा कर्जवसुलीसाठी तगादा शेतकऱ्यांच्या मागे लागणार नाही.

आंदोलकांच्या वतीने मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांना देण्यात आले. या आंदोलनात माजी खासदार पाटील यांच्यासोबत चंद्रकांत कदम, प्रमोद शेंडगे, दिग्विजय पाटील, सुखदेव पाटील, गजानन कोळी, सुनील पाटील, विक्रम पाटील, सुनील जाधव, महादेव पाटील, नितीन पाटील, प्रभाकर पाटील, ईडर व्हनखंडे, नामदेव पाटील, संदीप पाटील, बाबासाहेब पाटील आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.