संदीप आचार्य 
मुंबई : साहेब, ही धर्मशाळा नसती तर फुटपाथवर राहावे लागले असते. माझ्या पाच वर्षाच्या मुलाला घेऊन कॅन्सर उपचारा करणे कठीण झाले असते… करोनाची भीती इथे वाटत नाही कारण सर्व काळजी घेतली जाते. रोज हळदीच दूध आणि फळही आम्हाला दिली जातात… चाळीशीचे मुन्ना तिवारी भरभरून बोलत होते… आमच्या युपी मध्ये कॅन्सर रुग्णांसाठी चांगलं रुग्णालय नसल्यामुळे मुंबईत यावे लागले. इथे उपचारही चांगले आहेत व राहाण्याखाण्याची सोय उत्तम आहे… झारखंड, पश्चिम बंगालपासून बिहारमधून गाडगेबाबा धर्मशाळेत आलेल्या प्रत्येकाचे हेच म्हणणे होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशभरातून हजारो कॅन्सर रुग्ण मुंबईतील परळ येथील टाटा कॅन्सर रुग्णालयात उपचारासाठी येत असतात. जवळपास ७५ हजाराहून अधिक कॅन्सर रुग्णांवर टाटा हॉस्पिटलमध्ये केमोथेरपी, रेडिएशन किंवा शस्त्रक्रिया केल्या जातात. बिहार, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, झारखंड पासून देशाच्या कानाकोपऱ्यातून येणार्या रुग्णांसाठी दादार येथील दादासाहेब फाळके मार्गावरील ‘संत गाडगेबाबा धर्मशाळा’ हे एक मंदिर बनले आहे. देशभरात करोना पसरला आणि लॉकडाउन जाहीर झाले तेव्हा एप्रिल व मे महिन्यात उपचारानंतर धर्मशाळेत अडकलेल्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना गाडगेबाबा धर्मशाळा व्यवस्थापनाने रुग्णवाहिकेतून सुरक्षितपणे त्यांच्या घरी सोडण्याचेही काम केले.

करोनाच्या गेल्या सहा महिन्यात देशातील सर्वच रुग्णालयात करोना व्यतिरिक्तच्या रुग्णांची संख्या रोडावली. बहुतेक रुग्णालयांनी अत्यावश्यक शस्त्रक्रिया वगळता अन्य शस्त्रक्रिया थांबवल्या होत्या. टाटा कॅन्सर रुग्णालयातही नेहमीच्या रुग्णांना स्थानिक पातळीवर उपचारासाठी मार्गदर्शन केले जात होते तसेच अत्यावश्यक शस्त्रक्रियाच केवळ केल्या जात होत्या. आजही या परिस्थितीत फारसा बदल नसला तरी देशभरातून रोज शेकडो नवीन कॅन्सर रुग्ण उपचारासाठी टाटा रुग्णालयात धाव घेत आहेत. यातील बहुतेक रुग्णांची आर्थिक परिस्थिती यथातथाच असून अशा सर्व रुग्ण व नातेवाईकांचा आसरा बनण्याचे काम करोना काळातही गाडगेबाबा धर्म शाळा उत्तमरित्या बजावत आहे.

दादरच्या या सात मजली धर्मशाळेत सुमारे ७५० लोकांची राहाण्याची व्यवस्था आहे. सध्या येथे रुग्ण व नातेवाईक मिळून ५२० लोक राहात असून त्यांना सकाळचा नाश्ता, दुपारी व रात्री जेवण आणि सायंकाळी हळद घातलेले दूध व फलाहार दिला जातो असे धर्मशाळेचे मुख्य व्यवस्थापक प्रशांत देशमुख यांनी सांगितले. करोना आणि कॅन्सर रुग्ण यांचा विचार करूनच हळदीच दूध व फलाहार देण्यास सुरुवात केल्याचे त्यांनी सांगितले. आमच्या धर्मशाळेत आज १९० रुग्ण असून त्यात ३५ लहान मुले आहेत. १९८४ साली संत गाडगेबाबा धर्मशाळा सुरु झाली.

आज करोनाच्या कठीण काळातही आमचे सर्व कर्मचारी शंभर टक्के काम करत आहेत. मी स्वत: कुटुंबासह येथे राहात असून येथे येणार्या कोणत्याही रुग्णाला परत पाठवले जात नाही. अडचण असेल तर तात्पुरती कार्यालयात व्यवस्था केली जात असेही प्रशांत देशमुख म्हणाले. करोनाच्या काळात पश्चिम बंगाल, युपी, बिहार व झारखंड येथून आलेल्या रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. सुदैवाने संस्थेला दानशूर लोकांची कमतरता कधीच भासली नाही. त्यामुळेच उत्तम जेवणा बरोबर आज आम्ही हळदीच दूध व फळे रुग्णांना देऊ शकतो. इगतपुरी येथील एका दानशूर व्यक्तीने ट्रकभर सॅनिटाइजर पाठवून दिल्यामुळे रोज सातही मजले तसेच स्वच्छता गृह योग्य प्रकारे सॅनिटाइज करू शकतो असेही देशमुख म्हणाले. अनेक लोकांनी रोजच्या जेवणाची जबाबदारी उचलली आहे. म्हणजे त्यासाठी लागणारे पैसे त्यांनी पाठवले असून २०२३ पर्यंतच्या जेवणाच्या तारखा बुक झाल्याचे त्यांनी सांगितले.

गाडगेबाबा धर्मशाळेत खोलीसाठी ७० रुपये रोज व हॉलमध्ये राहाण्यासाठी ५० रुपये आकारले जातात. यातच नाश्ता व दोन्ही वेळच्या जेवणाचाही समावेश आहे. अनेक रुग्णांकडून तेही पैसे नसतात अशांसाठीही दानशूर लोक नेहमीच पुढाकार घेऊन त्यांचे पैसे भरत असतात. खरतर करोनाचा काळ आमच्यासाठी एक आव्हान होते. रोज किमान बाराशे लोकांच्या जेवणाची व्यवस्था, स्वच्छता, उपचारासाठी रुग्णालयात जाण्यासाठी मदत अशा एक ना दोन अनेक जबाबदारी होत्या पण गाडगेबाबांच्या शिकवणुकीमुळे आम्ही चोखपणे काम करत आहोत. सध्या रेल्वेच्या अडचणीमुळे परराज्यातील बहुतेक रुग्ण खासगी गाड्या करून येथे येतात. जवळपास दहा खासगी वाहनातून रोज कॅन्सर रुग्ण उपचारासाठी येतात आणि आपल्या हक्काच्या संत गाडगेबाबा धर्मशाळेत एका विश्वासाने उतरतात.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sant gadgebaba dharmshala helps lot of cancer patients in the country in corona scj
First published on: 23-09-2020 at 16:45 IST