Santosh Deshmukh : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची डिसेंबर महिन्यात अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. या घटनेचे तीव्र पडसाद हे हिवाळी अधिवेशनातही उमटलेले पाहण्यास मिळाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत निवेदन द्यावं लागलं. या प्रकरणात वाल्मिक कराडचा हात आहे असं बोललं जातं आहे. दरम्यान वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय असून तो ३१ डिसेंबरला शरण आला आहे. मात्र सगळे आरोपी अद्याप पकडेले गेलेले नाहीत. त्यामुळे बीडमध्ये निषेध मोर्चा काढण्यात आला होता. एक महिना होऊन गेला आम्हाला न्याय कधी मिळणार असा प्रश्न संतोष देशमुख यांच्या मुलीने विचारला आहे. तर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय यांनी आरोपींना फाशी देण्याची मागणी केली आहे.

निषेध मोर्चामध्ये संतोष देशमुख यांचा भाऊ आणि मुलगी सहभागी

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर दुसरीकडे या प्रकरणातील मास्टर माईंड असल्याचा संशय ज्याच्यावर आहे तो वाल्मिक कराड ३१ डिसेंबरला पोलिसांना शरण आला आहे. न्यायालयाने त्याला १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय असल्याने धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशीही मागणी केली जाते आहे. आज पुण्यात संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय आणि संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी सहभागी झाले होते.

संतोष देशमुखांचे बंधू धनंजय यांनी काय म्हटलं आहे?

“आम्हाला न्याय पाहिजे म्हणून आम्ही मोर्चात सहभागी झालो आहोत. तसंच आरोपींना फाशी झाली पाहिजे ही आमची मागणी आहे. न्याय कुठल्या पद्धतीने देतील तो सरकारचा प्रश्न आहे. आमची मागणी आहे की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट आम्ही लवकरच घेणार आहोत, किंवा ते आमची भेट घेतील. त्यांच्याकडे आम्ही काय मागणी केली याची माहिती नंतर माध्यमांना दिली जाईल.” अशी माहितीही धनंजय देशमुख यांनी दिली.

संतोष देशमुख यांच्या कन्या वैभवी काय म्हणाल्या?

“आमची मागणी हीच आहे की आम्ही न्याय मागत आहोत, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. संतोष देशमुख यांची हत्या होऊन महिना झाला आहे. तरीही आरोपी पकडले जात नसतील तर आम्हाला न्याय कसा मिळणार? माझी विनंती आहे प्रशासनाला की जे कुणीही आरोपींची मदत करत असतील, त्यांना या प्रकरणात सहआरोपी केलं पाहिजे. आम्ही आज न्याय मागत आहोत आम्हाला न्याय द्या हीच आमची मागणी आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर आमचा विश्वास आहे. त्यांनी आम्हाला सांगितलं आहे की न्याय मिळवून देऊ. आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळावा ही आमची अपेक्षा आहे.” असं वैभवीने म्हटलं आहे.

Story img Loader