सातारा : उपवासाच्या तयार भाजणी पिठाच्या भाकरी खाल्ल्याने वडूज (ता. खटाव) परिसरातील सुमारे ३५ जणांना विषबाधा झाली आहे. त्यापैकी काही जणांवर वडूज येथील खासगी रुग्णालयात तसेच ग्रामीण रुग्णालय, जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्र वडूज येथे उपचार सुरू आहेत. आज दुपारी हा प्रकार उघडकीस आला.

सध्या नवरात्र उत्सव सुरू असून, अनेक ठिकाणी त्यानिमित्त उपवास केले जात आहेत. उपवासाच्या वेगवेगळ्या पद्धती व खाद्यपदार्थ अंगीकारले जात आहेत. खटाव तालुक्यातील विविध ठिकाणच्या दुकानातून नागरिकांनी उपवासाच्या तयार भाजणीचे पीठ खरेदी केले होते. या भाजणी पिठाची भाकरी खाल्ल्यानंतर सायंकाळपासून यातील बहुतांश रुग्णांना चक्कर येणे, मळमळ होणे, हातापायात कंप भरणे तर काही रुग्णांना उलट्या, जुलाबाचा त्रास होऊ लागला. या रुग्णांमध्ये २५ जणांवर खासगी रुग्णालयात तर तीन जणांवर वडूज ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. युनूस शेख, ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. लीला मदने यांनी अधिकृत दुजोरा दिला आहे. तसेच ते दोघे परिस्थितीवर नियंत्रण ठेवून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. यापैकी अनेक रुग्णांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असून, काहींना सायंकाळपर्यंत घरी सोडण्यात आले आहे, असे वैद्यकीय सूत्राने सांगितले.

दुकानदारांवर कारवाई

याप्रकरणी अद्याप कोणत्याही रुग्णाने पोलीस ठाण्यात तक्रार दिली नाही. तरीही खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन रुग्णांची विचारपूस केली. रुग्णांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या दुकानातून भाजणी पीठ खरेदी करण्यात आले, त्या तीन दुकान मालकांना समजपत्र काढण्याबरोबरच अन्न व भेसळ विभागाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. रुग्णालयाकडून वैद्यकीय अहवालाची प्रत पोलीस ठाण्यास प्राप्त होताच दोषी दुकानदारांविरोधात गुन्हा नोंद करणार असल्याची माहितीही पोलिसांनी दिली.

खटाव भागातील मांडवे, पळशी, दहिवडी, बोंबाळे, किरकसाल, वडूज यांसारख्या अनेक गावांमधील महिला पुरुष यांना विषबाधा झाली आहे. नवरात्र उत्सवातील उपवास असल्याने या उपवासासाठी अनेकजण फराळ करत असतात. त्यानुसार वरवी पिठाची भाकरी करून खात असतात. हि भाकरी खाल्ल्याने २५ हून अधिक महिलांना विषबाधा तर १० हून अधिक पुरुषांना विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

बाधित झालेल्या रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अनेक नागरिकांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. तर वरवी पिठाची भाकरी उपवास असलेल्या लोकांनी खाऊ नये; असे आवाहन देखील आता प्राथमिक आरोग्य केंद्र कडून करण्यात येत आहे.