-विश्वास पवार

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याची दुरावस्था झालेली असतानाही आणि आवश्यक सेवासुविधा मिळत नसतानाही आणेवाडी टोलनाक्यावर टोल वसुली होत असल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच रिलायन्स इन्फ्राविरोधात टोलविरोधी घोषणा देत टोल वसुली बंद पाडण्याचा प्रयत्न करत निदर्शने केली म्हणून दाखल झालेल्या गुन्ह्यात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह १७ जणांना आज(दि.२७) वाई न्यायालयाने जामीन मंजूर केला.

१८ डिसेंबर २०१९ रोजी सकाळी साडेअकरा ते दुपारी अडीच वाजेपर्यंत आणेवाडी टोलनाक्यावर सातारा बाजूकडून विरामाडे (ता वाई)गावाकडे टोलनाक्याच्या लेन क्रमांक एकच्या बाजूस कठड्यावर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व त्यांच्या समर्थकांनी टोल नाक्यावर टोल वसुली बंद पाडण्याचा प्रयत्न करत टोल नाक्यावर बसून विरोधी घोषणा देत निदर्शने केली. तसंच, साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचा जमावबंदी आदेशाचा भंग केला म्हणून पोलीस कर्मचारी धनाजी तानाजी कदम यांनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या सुनावणीसाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व इतरांवर वेळोवेळी समन्स बजावण्यात आले होते. मात्र ते न्यायालयात उपस्थित राहत नव्हते. आज आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व सर्व संशयित १७ जण न्यायालयात उपस्थित राहिले. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व्ही एन गिरवलकर यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. पाच हजाराच्या जातमुचलक्यावर शिवेंद्रसिंहराजेंना न्यायालयाने जामीन मंजूर केला. शिवेंद्रसिंह व इतरांच्या वतीने शिवराज धनवडे ,आर डी साळुंखे,संग्राम मुंडेकर,प्रसाद जोशी यांनी तर सरकार पक्षाच्या वतीने मिलिंद पांडकर यांनी काम पाहिले.पुढील सुनावणी ९ डिसेंबर रोजी होणार आहे.

याच आणेवाडी टोलनाक्याचे व्यवस्थापन खासदार उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांकडून आपल्याकडे घेण्यासाठी गेले असता हस्तांतर आणि ताब्यावरून उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे यांच्यासह समर्थकांमध्ये टोल नाक्यावर आणि नंतर सातारा येथे ६ ऑक्टोबर २०१७ रोजी धुमश्चक्री झाली होती.