सातारा जिल्हा बँक निवडणुकीत चुरस

रामराजे नाईक-निंबाळकर यांच्याकडे नेतृत्व

रामराजे नाईक-निंबाळकर यांच्याकडे नेतृत्व

विश्वास पवार, लोकसत्ता

वाई : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सत्ताधारी गटाचे नेतृत्व विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्याकडे राहणार आहे.  राजकारणविरहित पॅनेल ठरवतानाही कोणाला काय द्यायचे आणि कोणाला कसे सोबत घ्यायचे याचे निर्णय रामराजेंच्या हाती असेल.

खासदार उदयनराजे भोसले  यांनी या वेळी  तीन जागांची मागणी केली आहे तर काँग्रेसने सर्वसमावेशक पॅनेलमध्ये सन्मानाने जागा मिळाव्यात अशी अपेक्षा के ली आहे. अन्यथा काँग्रेस पक्ष स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहे तर शिवसेनेनेही बँकेत जागा मिळाव्यात अशी मागणी केली आहे भाजपचे आमदार व संचालक जयकुमार गोरेही मैदानात आहेत.

या वेळची बँकेची निवडणूक विलासराव पाटील-उंडाळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते लक्ष्मणराव पाटील यांच्या पश्चात होणारी ही पहिलीच निवडणूक आहे. जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी या वेळेस सर्वच पक्ष सक्रिय झाले आहेत. पण, ही निवडणूक सर्वाच्या सहकार्याने बिनविरोध करण्याची भूमिका राष्ट्रवादीची आहे. त्यांना महाविकास आघाडीतील घटक पक्षांना सामावून घ्यायचे नाही. त्यामुळे प्रत्येक जण राष्ट्रवादीवर दबावतंत्र अवलंबून जिल्हा बॅंकेत आपल्या पक्षाचा संचालक कसा होईल, यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसत आहे.

सुरुवातीपासून काँग्रेसचे प्राबल्य

अगदी स्थापनेपासून जिल्हा बॅंक ही काँग्रेस पक्षाच्या ताब्यात राहिली. यामध्ये किसन वीर आबांच्या नंतर काँग्रेसचे नेते विलासराव पाटील-उंडाळकर लक्ष्मणराव पाटील यांनी बॅंकेची धुरा सांभाळली. सर्वाधिक कालावधी विलासराव पाटील त्यांच्याच नेतृत्वाखाली बॅंकेची वाटचाल राहिली. त्यांनी बॅंक उत्तम प्रकारे चालवली. त्यानंतर लक्ष्मणराव पाटील यांनी राष्ट्रवादीच्या संचालकांनी बॅंक ताब्यात घेतली.

विलासराव पाटील-उंडाळकर यांचे निधन झाल्याने त्यांचा पश्चात आता त्यांचे चिरंजीव अ‍ॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांना बॅंकेवर संचालक म्हणून घ्यावे, अशी मागणी कऱ्हाड दक्षिण मतदारसंघातील कार्यकर्त्यांची आहे, तशीच काँग्रेसच्या नेत्यांचीही आहे. सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना कराड विकास सेवा सोसायटी मतदारसंघातून बॅंकेवर संचालक म्हणून निवडून यायचे असल्याने या मतदारसंघातून इच्छुक असूनही उदयसिंह पाटील यांना येता येणार नाही. खटाव, कराड, कोरेगाव, वाई, तसेच बॅंका, पतसंस्था तसेच गृहनिर्माण आणि पाणीपुरवठा मतदारसंघातून उमेदवार देण्याची काँग्रेसची तयारी आहे.

खासदार उदयनराजेंनी आपल्या स्वत:च्या संचालक पदासोबतच आणखी दोन जागा हव्या आहेत. त्यामुळे ते गृहनिर्माण आणि पाणीपुरवठा मतदारसंघातून या वेळेसही लढणार हे निश्चित आहे.  राष्ट्रवादी काँग्रेस शिवेंद्रसिंहराजेंना पुढे करून शशिकांत शिंदे आणि उदयनराजे यांना या निवडणुकीच्या निमित्ताने शह देण्याचा प्रयत्न करणार हे निश्चित.

बँकेत राष्ट्रवादीचे बहूमत आहे. रामराजे यांनी शिवेंद्रसिंहराजे यांना उदयनराजेंना शह देण्यासाठी मागील पाच वर्षांंच्या अध्यक्षपदाला आक्षेप घेतला नाही. पक्ष बाजूला ठेवून बँकेत पक्षविरहित राजकारण केले. जिल्हा बँकेचे नेतृत्व करताना रामराजेंना लक्ष्मणराव पाटील आणि आ. शिवेंद्रसिंहराजेंची या दोन नेत्यांची खंबीर साथ मिळाली. या दोन्ही नेत्यांच्या साथीमुळे रामराजेंनी बँकेवरील आपली पकड मजबूत ठेवली आहे. भविष्याचा विचार करून रामराजेंनी सहकार मंत्री व पालकमंत्री बाळासाहेब पाटील, शिवेंद्रसिंहराजेंना, आमदार मकरंद पाटील कोठेही नाराज केले नाही. शिवेंद्रसिंहराजे यांच्या कलाने बँकेत निर्णय घेतले. रामराजे आणि शिवेंद्रसिंहराजे या जिल्ह्य़ाच्या राजकारणातील एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. दोघेही एकत्रितपणे जिल्ह्य़ाचे अनेक निर्णय ठरवतात. शिवेंद्रसिंहराजे काय भूमिका घेतील, याचा अंदाज घेवूनच रामराजेही अनेक निर्णय घेत असतात. शिवेंद्रसिंहराजे भाजपमध्ये गेल्यानंतरही त्यांना न दुखवता आपल्यासोबतच ठेवण्यात रामराजे यशस्वी झाले आहेत. त्यामुळेच जिल्हा बँकेत विरोधी सक्षम पॅनेल होण्याची फार मोठी शक्यता तूर्त तरी दिसत नाही. त्यामुळे उदयनराजे सोडून काँग्रेस,शिवसेना जयकुमार गोरे आणि इतरांबाबतचा निर्णय आज तरी गुलदस्त्यात आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Satara district bank election ramraje naik nimbalkar zws

Next Story
‘कोरा कागद निळी शाई, आम्ही कोणाला भीत नाही’!
ताज्या बातम्या