विश्वास पवार, लोकसत्ता

वाई: सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत साताऱ्याच्या दोन्ही राजांचा संघर्ष सुरू आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसप्रणीत सर्वपक्षीय पॅनेलमध्ये समावेश केला नसल्याबद्दल खासदार उदयनराजे भोसले यांनी जाब विचारला आहे. याबाबत मला विचारण्यापेक्षा हा प्रश्न शरद पवार यांना विचारा, असे स्पष्ट करत बँकेचे अध्यक्ष व आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी उदयनराजेंना पवारांकडे जाण्याचा सल्ला दिला आहे.

बँकेच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी पॅनेलचे उमेदवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे येथे झालेल्या बैठकीत निश्चित करण्यात आले. सत्ताधारी पॅनलमधून खासदार उदयनराजेंना उमेदवारी देण्याबाबत एकमत न झाल्याने उदयनराजेंच्या विरोधात सत्ताधारी पॅनेलने निवडणूक लढण्याची तयारी केली आहे. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सत्ताधारी पॅनेलच्या आमदार मकरंद पाटील यांच्यासह राजेंद्र राजपुरे व शिवरूपराजे खर्डेकर हे तिघेही एक एक अर्ज आल्याने बिनविरोध झाले आहेत.

दि. १० नोव्हेंबर २०२१ हा उमेदवारी माघार घेण्याचा शेवटचा दिवस आहे. संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी २१६ उमेदवारी अर्ज आले आहेत.

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत खा. उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादीच्या सर्वपक्षीय पॅनलमध्ये अद्याप जागा देण्याचा विचार झालेला नाही. त्यामुळे उदयनराजेंनी दबावतंत्राचा वापर सुरू करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना रयत शिक्षण संस्थेवरून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जरंडेश्वर शुगर मिलमधील गुरू कोण, असे विचारत शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे संचालक मंडळ यांच्यावर टीका केली आहे.

पर्यायी पॅनेलची चाचपणी

उदयनराजेंनी उमेदवारीसाठी ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांची भेट घेतली होती. त्यांनी शिवेंद्रसिंहराजेशी बोलून घेण्यास सांगितले होते. मात्र उदयनराजे यांच्या उमेदवारीवर अद्याप कोणाचेही एकमत होताना दिसत नाही. उदयनराजेंनी केलेल्या टीकेला फक्त शिवेंद्रसिंहराजे भोसले उत्तर देत आहेत. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘सर्वसमावेशक’ला शह देण्यासाठी आमदार जयकुमार गोरे व खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या नेतृत्वाखालील भाजपप्रणीत सर्वसमावेशक पॅनेल उभे राहणार आहे. त्यासाठीची जुळणीही या दोन नेत्यांनी केल्याचे सांगितले आहे.

आजपर्यंत मी तत्त्वे जपली आहेत. जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना मी अर्ज देऊन जरंडेश्वरच्या कर्जाची माहिती मागितली आहे. ही माहिती देण्यास अध्यक्षांनी होकार दिला नाही, तर २९ तारखेला संचालक मंडळाच्या बैठकीत विचार करून आम्ही तुम्हाला माहिती देण्याबाबत अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. गुरू कमोडिटी व जरंडेश्वर कारखान्याला बेकायदेशीर कर्ज दिले आहे काय? आम्ही गेलो की जागा अडवली काय? मी जाग अडवली असेल तर मग सगळ्यांचेच बाहेर काढा. ज्यांनी ज्यांनी सहकारी संस्था मोडीत काढल्या त्यांनी १० तारखेच्या आत जिल्हा बँकेतून अर्ज मागे घ्यावेत. तसे झाले तर माझी माघार असेल. मी जागा अडवण्यासाठी बँकेत आलो नाही.

उदयनराजे भोसले, खासदार

निवडणुकीत कुणीही, काहीही करू दे, काही फरक पडत नाही. बँकेत जागा कोणी अडवली हे त्यांना माहिती आहे. बँकेची कोणतीही ईडीची चौकशी लागलेली नाही. त्यांना याबाबत जास्त माहिती दिसत नाही. ते बँकेत कधी येत नाहीत. आता निवडणूक लागलेली असल्यामुळे बँकेत त्यांचे येणे-जाणे सुरू झाले आहे. जरंडेश्वर साखर कारखान्याचा लिलाव झाला तेव्हा बँकेने त्यांना कोणतेही पैसे दिले नाहीत. जरंडेश्वर शुगर कारखान्याला बँकेने त्यांना थेट कर्जपुरवठाही केलेला नाही. पुणे जिल्हा बँकेमार्फत त्यांना बँकेने कर्जपुरवठा केला आहे. त्यांचे हप्ते नियमित आहेत. याबाबतची माहिती ईडीने मागितल्यानंतर त्यांना आवश्यक ती माहिती पुरविण्यात आली आहे.

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, अध्यक्ष, सातारा जिल्हा बँक