सातारा : ग्रामीण भागातील लोकांच्या जीवनात आर्थिक परिवर्तन करण्यासाठी सातारा जिल्हा बँकेचे नेहमीच सहकार्य राहील, अशी ग्वाही खासदार नितीन पाटील यांनी दिली.

हरिपूर (ता. खंडाळा) येथील नवीन विकास सेवा सोसायटीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष बकाजीराव पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, संचालक दत्तानाना ढमाळ, राजेंद्र राजपुरे व रामभाऊ लेंभे, जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रीक, सहायक निबंधक अनिल क्षीरसागर, प्रीती काळे, पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष हरिष पाटणे, पतसंस्था फेडरेशनचे संचालक दत्तात्रय पवार आदी उपस्थित होते.

खासदार पाटील म्हणाले, “ग्रामीण सहकार चळवळ बळकट करण्यासाठी विकास सोसायट्या सक्षम असणे गरजेच्या आहेत. त्याच भूमिकेतून खंडाळा तालुक्यात २७ वर्षांनंतर ही ५२ वी विकास सेवा सोसायटी स्थापन झाली असून, ती हरिपूरमधील लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी एक महत्त्वाचे साधन ठरू शकते. या सोसायट्यांच्या माध्यमातून लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी आणि समाजाच्या विकासासाठी विविध उपक्रम राबवावेत. त्यासाठी जिल्हा बँकेच्या माध्यमातून सर्व सहकार्य करण्यात येईल.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या वेळी सातारा जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल किरण पाटणे व नीट परीक्षेत यश मिळवल्याबद्दल शर्वरी पाटणे हिचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी डॉ. सरकाळे, संजय सुद्रिक, दत्तानाना ढमाळ आदींनी मनोगत व्यक्त केले. हरिष पाटणे यांनी प्रास्ताविक केले. विठ्ठल माने यांनी सूत्रसंचालन केले. जालिंदर पवार यांनी आभार मानले.