वाई : साताऱ्याच्या आरोग्य क्षेत्रातही प्रगती झालेली आहे. जिल्हा शहरी भागाबरोबरच दुर्गम आणि डोंगराळ भागांनीही वेढलेला असल्याने येथील रुग्णांसाठी आरोग्य विभागाने चांगल्या सोयी उपलब्ध केल्या आहेत. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण जिल्हा रुग्णालय सातारा येथे सर्व प्रकारच्या तपासण्या, उपचार व शस्त्रक्रिया केल्या जातात. जिल्हा, ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयात खाटांची संख्या पुरेशी वाढलेली आहे.

सातारा येथे नव्याने शासकीय वैद्याकीय महाविद्यालय सुरू झाले आहे. सातारा जिल्हा रुग्णालय ग्रामीण रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालयावर अवलंबित रुग्णांची संख्या मोठी आहे. दुर्गम डोंगराळ भागातूनही रुग्णांना या सुविधांचाच आधार आहे. साताऱ्यात एक जिल्हा, १७ ग्रामीण व ३ उपजिल्हा रुग्णालये आहेत. शिवाय अनेक प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. शासकीय रुग्णालयात आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध असून, अनेक सामान्य व महत्त्वाच्या आणि अवघड शस्त्रक्रिया केल्या जातात. जिल्हा रुग्णालयात रक्ताच्या व इतर सर्व तपासण्या होतात. आठ ते दहा वर्षांतील ज्या लहान मुलांना जन्मजात ऐकू न येण्याचे कानाचे अपंगत्व असते अशा मुलांवर शस्त्रक्रियांसाठी स्वतंत्र विभाग आहे. काही शस्त्रक्रिया रुग्णालयात होतात, तर काही शासकीय जिल्हा रुग्णालयामार्फत खासगी रुग्णालयातून मोफत करून घेतल्या जातात. याशिवाय लहान मुलांत असलेल्या जन्मजात रक्तदोषावरही रुग्णालयात उपचार केले जातात. यासाठी अतिशय महागडी औषधे शासकीय रुग्णालयातून उपलब्ध करून दिली जातात.

साताऱ्यात ‘प्रधानमंत्री आयुष्यमान भारत’अंतर्गत ५० खाटांचे रुग्णालय मंजूर झाले आहे. त्याचे कामही प्रगतिपथावर आहे. याशिवाय हृदयरोग शस्त्रक्रिया व तपासणी उपचार याचेही रुग्णालय मंजूर झाले आहे. याशिवाय सोनोग्राफी, एक्स-रे, एमआरआय आदी अनेक महत्त्वाच्या तपासण्यांचा विभाग २४ तास सुरू असतो. लवकरच सीटी स्कॅन सेवा उपलब्ध होईल. त्याचा फायदा जिल्ह्यातील रुग्णांना होणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी युवराज कर्पे यांनी सांगितले.

हेही वाचा >>> कारागृह रक्षकांच्या १८०० जागांसाठी पावणेचार लाख अर्ज

वीजवापरात वाढ

औद्याोगिक प्रगतीमुळे वीजवापरात वाढ झाली आहे. साताऱ्यात १० हजार ३०० औद्याोगिक ग्राहक आहेत, तर साडेसात हजार यंत्रमाग व इतर ग्राहकांची नोंद आहे. शेतीसाठी वीजवापर वाढला आहे. प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या साताऱ्यात इतर जिल्ह्यांच्या मनाने दररोज दरडोई वीज वापर कमीच आहे.

साताऱ्याच्या आरोग्य क्षेत्रात अनेक आमूलाग्र बदल झाल्याचे दिसून येते. मागील काही वर्षांत येथे सुरू झालेल्या अनेक सुविधा जिल्हा, ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध आहेत. नव्याने पंतप्रधान आयुष्यमान भारत व हृदयरोग उपचार, तपासणी व इतर विभाग मंजूर झाले आहेत. ते उभारणीत प्रगतिपथावर आहेत. या सर्व सुविधांचा रुग्णांना चांगला फायदा मिळत आहे. रुग्णांना सहज आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी, असा प्रयत्न आहे.

युवराज कर्पेजिल्हा आरोग्य अधिकारी, सातारा