Phaltan Women Doctor Suicide Case: सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या वरिष्ठ महिला डॉक्टरने आत्महत्या केल्यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. मृत डॉक्टर तरूणीने आपल्या तळहातावर आत्महत्येचे कारण लिहून ठेवलेले आढळले. याचा फोटो माध्यमांनी प्रसिद्ध केला. त्यात एका पोलीस उपनिरीक्षकाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान मृत डॉक्टर तरूणीच्या आतेभावाने माध्यमांशी बोलताना अनेक धक्कादायक आरोप केले आहेत.
डॉक्टर तरूणीची आत्महत्या झाल्यानंतर तिच्या कुटुंबियांनी आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी केली आहे. मृत तरूणीच्या भावाने माध्यमांशी बोलताना सांगितले की, ती दोन वर्षांपूर्वी फलटन उपजिल्हा रुग्णालयात रुजू झाली होती. मागील वर्षभरापासून तिला नेहमीच शवविच्छेदन विभागात ड्युटी लावली जात होती. शवविच्छेदन करत असताना तिच्यावर राजकीय मंडळी दबाव टाकत असत.
“काही प्रकरणांमध्ये रुग्ण रुग्णालयात नसतानाही त्याच्या नावाने रिपोर्ट बनवून मागितला जात होता. सततचा दबाव तिला असह्य झाला होता. याबद्दल तिने तिच्या मोठ्या बहिणीला माहिती दिली होती. तिची मोठी बहिणही वैद्यकीय अधिकारी आहे. पण हे प्रकरण इतके गंभीर होईल, असे कुणालाही वाटले नव्हते. दोन दिवसांपासून तिचे आणि कुटुंबियांचे बोलणेही झाले नव्हते”, अशी माहिती मृत डॉक्टर तरूणीच्या भावाने दिली.
जून महिन्यात बहिणीने जिल्हा पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक यांना पत्र देऊन या प्रकाराची तक्रार दिली होती. त्याची पोचपावतीही आमच्याकडे आहे. परंतु तरीही त्यावर कोणती कारवाई झाली नाही, अशीही खंत भावाने व्यक्त केली.
एफआयआर दाखल करण्यासाठी ४ ते ५ तास लावले
दरम्यान याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या उपनिरिक्षकास निलंबित करण्यात आल्याची माहिती सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिली. मात्र मृत तरुणीच्या कुटुंबियांनी गुन्हा दाखल करून घेण्यास हलगर्जीपणा केल्याचा आरोप केला. डॉक्टर तरुणीच्या भावाने टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले की, एफआयआर दाखल करण्यास ४ ते ५ तासांचा उशीर केला गेला. त्यानंतर शवविच्छेदन करण्यासाठी दोन ते तीन तास कोणतेही डॉक्टर आले नाहीत. या प्रकरणात राजकीय दबाव झाल्याचा आमचा संशय आहे.
महिला आयोगानेही घेतली दखल
या प्रकरणाची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली असून कारवाईचे आदेश दिले आहेत. यावर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया देताना पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळवून देणार असल्याचे सांगितले.
