Satara Doctor Suicide Case: सातारा जिल्ह्यामधील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरूणीने आत्महत्या केल्याच्या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. पोलिसाच्या छळाला कंटाळून आत्महत्या करावी लागल्याचे सदर तरूणीने मृत्यूपूर्वी आपल्या हातावर लिहिले होते. या घटनेनंतर विरोधकांनी गृहविभागावर टीका केली. तसेच आता या प्रकरणात मृत डॉक्टर तरूणीने लिहिलेल्या चार पानांच्या कथित सुसाइड नोटचाही उल्लेख होत आहे. ज्यात अनेक धक्कादायक आरोप करण्यात आलेले आहेत. यानंतर आज साताऱ्याच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांनी या प्रकरणाची अधिक माहिती दिली.

पीटीआय वृत्तसंस्थेने वैशाली कडूकर यांच्या मुलाखतीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्यांनी म्हटले, “डॉक्टर तरूणीला जर त्रास होत होता, तर त्यांनी वेळीच कुणाला तरी सांगायला हवे होते. नातेवाईक, मित्र यांना माहिती दिली असती तर वेळीच या प्रकरणात दखल घेतली गेली असती आणि डॉक्टर तरूणीचे प्राण वाचले असते. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे.”

२९ वर्षीय डॉक्टर साताऱ्याच्या फलटणमधील सरकारी उपजिल्हा रुग्णालयात कंत्राटी पद्धतीने वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होती. गुरूवारी रात्री फलटण शहरातील एका हॉटेलमधील खोलीत तिचा मृतदेह आढळून आला होता. मृत डॉक्टरने आपल्या तळहातावर आत्महत्येचे कारण लिहिले असून त्यात दोन लोकांचा उल्लेख केलेला होता. यापैकी एक फलटणमधील पोलीस उपनिरीक्षक असून दुसरा व्यक्ती डॉक्टर फलटणमध्ये भाड्याने राहत असलेल्या घरमालकाचा मुलगा आहे.

डॉक्टरची आत्महत्या वैयक्तिक बाबींमधून

अतिरीक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांनी शनिवारी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा त्यांना वैद्यकीय अधिकारी आणि पोलीस प्रशासन यांच्यातील विसंवादामुळे ही घटना घडली का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर त्या म्हणाल्या, “आरोपीला न्यायप्रक्रियेत घेऊन पीडितांना न्याय देणे हे वैद्यकीय अधिकारी आणि पोलीस प्रशासनाचे काम असते. सदर घटना अपवादात्मक आहे. ज्या कारणास्तव महिला डॉक्टरने आत्महत्या केली, ती त्यांची वैयक्तिक बाब वाटत आहे. त्याचा प्रशासकीय बाबींशी अर्थाअर्थी संबंध नाही, असे वाटते.”

सर्वच पोलीस वाईट नसतात

फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणाबाबत माध्यमात ज्या बातम्या येत आहेत, त्या पाहून वाईट वाटत असल्याची प्रतिक्रिया वैशाली कडूकर यांनी दिली. त्या म्हणाल्या, सर्वच पोलीस वाईट नसतात. पोलीस प्रशासनात चांगले अधिकारी असल्यामुळेच पोलीस प्रशासन खंबीरपणे काम करत आहे. समाजात व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात. त्याला पोलीसही अपवाद नाहीत. पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांनी अधिक जाणीवपूर्वक आणि जबाबदारीने वागणे गरजेचे आहे.