छत्रपती संभाजीनगर : सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील एका शेतकरी तरुणास लग्नाचे आमिष दाखवून १ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक करून नवरी, मध्यस्थीची महिला व करवलीने पोबारा केल्याप्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध ५ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ३० जुलै रोजी घडली असून, वाळूज परिसरात त्या तरुणाच्या वाहनावर हल्लाही करण्यात आला. हल्ला केल्याची तक्रार वाळूज ठाण्यातही नोंद झाल्याचे नवरदेवाकडील मंडळींकडून सांगण्यात आले.

याप्रकरणी नंदकुमार चव्हाण (रा. कोरेगाव तालुका), मोनिका मावशी व नवरी दिशा कदम (वय २५), अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार तरुण हा ३९ वर्षांचा असून, तो व्यवसायाने शेतकरी आहे. त्याला मुलगी दाखवून लग्न करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरात आणले. येथे तीन हजार रुपये तासाभरासाठीचे भाडे देऊन केलेल्या एका खोलीत मुलगी दाखवण्यात आली. नंतर एक लाख रुपये रोख आणि कोर्ट मॅरेज करायचे म्हणून मुद्रांकशुल्कसाठी वकिलाच्या खात्यावर पाच हजार रुपये, पाच साड्या खरेदीसाठी साडेचार हजार रुपये ऑनलाईन घेण्यात आले.

मुद्रांकशुल्कावर लग्नाच्या दृष्टीने स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. नवरीसोबतच्या करवलीला पुण्याला सोडायचे म्हणून वाळूजमार्गे नेण्यात आले. वाळूजमध्ये अचानक रात्रीच्या वेळी एक मोटार आडवी लावून नवरी, करवली व मध्यस्थ महिलेला त्यात बसवण्यात आले व नवरदेवाच्या मोटारवर हल्ला करण्यात आला. काचांची तोडफोड करण्यात आली. मोटारमधील ३५ हजार रुपये रोखही पळवण्यात आले. चालकाला मारहाण करण्यात आली. चालक हा नवरदेवाच्या गावातला असून, त्याच्या मध्यस्थीनेच स्थळ दाखवण्यात आल्याने त्याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला.