कायम दुष्काळी अशी ओळख असणाऱ्या साताऱ्यातील माण आणि खटाव या तालुक्यांत मे महिन्यापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मागील २० दिवसांपासून या परिसरात सुरू असणाऱ्या परतीच्या पावसाने तर पिकांसोबत शेतजमिनीचेही मोठे नुकसान केले आहे. शेतजमीन, रस्ते वाहून गेले आहेत. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. गावागावांत शेतीला तळ्यांचे स्वरूप आले आहे. सोयाबीन, मका, उडीद, कडधान्य, फळबागांना या पावसाचा मोठा फटका बसला आहे.

या भागात दर वर्षी दुष्काळ जाहीर करावा लागतो. टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. शेतकऱ्यांना पशुधन आणि मिळणारी पिके वाचविताना शिकस्त करावी लागते. या वर्षी मात्र मे महिन्यापासून सप्टेंबर महिन्यापर्यंत पाऊस सुरू आहे. सर्व पाझर तलाव, विहिरी मे महिन्यातच भरल्या आहेत. ओढे, नाले भरून वाहत आहेत. यातच मागील २० दिवसांत झालेल्या पावसाने शेती वाहून गेली आहे. शेतजमिनीला शेततळ्याचे स्वरूप आले आहे.

सोयाबीन, मका, उडीद, मूग, कडधान्य पिकाला मोठा फटका बसला आहे. शेतातील उभ्या पिकात पाणी साचून राहिल्याने पिके कुजली आहेत. शेतशिवारातील सखल भागात पाणी साठले आहे. जिल्ह्यात १६२ शेतकऱ्यांची पिके व शेतजमिनीचे लाखोंचे नुकसान झाले आहे. ४७ घरांची पडझड झाली आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे जिल्हा प्रशासनाने पंचनामे सुरू केले आहेत.

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, जावळी या पावसाळी तालुक्यांत उन्हाअभावी पावसाने पिकांची वाढ खुंटली आहे. भातपिके पिवळी पडली आहेत.स्ट्रॉबेरीच्या रोपांवर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने पावसाळी भागात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी होत आहे. पिकांची नुकसानभरपाई देण्याची मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे.