सातारा : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करण्याचा प्रकार सातारा शहरातील मंगळवार पेठ येथे उघडकीस आला आहे. अंजली राजेंद्र शिंदे (वय २९, मंगळवार पेठ, सातारा, मूळ पानमळेवाडी, ता. सातारा) असे मृत महिलेचे नाव आहे.
या घटनेनंतर मृत महिलेचा पती व भाऊ यांच्यात झटापट झाल्याने पती राजेंद्र भानुदास शिंदे (वय ३२) हा जखमी झाला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांनी दिली. या प्रकरणी श्रेयस अनिलकुमार पाटील, करंजे सातारा यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
संशयित आरोपी शिंदे याला दारूचे व्यसन होते. तसेच तो अंजलीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. यातूनच झालेल्या भांडणात त्याने तिचा खून केला. हा प्रकार उघड होताच अंजलीच्या भावाने त्याला माराहण केली. यामध्ये शिंदे जखमी झाल्याने त्याला अधिक उपचारासाठी सातारा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकारामुळे सातारा परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिर्के अधिक तपास करत आहेत.