सातारा : जोरदार पावसामध्ये याही वर्षी श्रावण महिन्यातील वद्य अष्टमी अर्थात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा मोठ्या उत्साहात आणि विविध धार्मिक कार्यक्रमांनी जिल्ह्यात व शहरात संपन्न झाला. यावर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमीचे औचित्य राखून अनेक कृष्णभक्तांनी उपवासाचे व्रत केले. रात्री बारा वाजता श्रीकृष्णाच्या जन्माचे कथन करत भगवान गोपाल कृष्ण की जय, राधे, राधे,.. जय श्री कृष्ण… अशा मोठ्या घोषणा देत हा भगवान श्रीकृष्णाचा जन्म सोहळा शेकडो कृष्णभक्तांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. आज दहीहंडी फोडून काल्याचे कीर्तन होऊन या कार्यक्रमाची सांगता झाली.
सातारा शहरात गोल मारुती मंदिरा नजीकच्या श्री दिवशीकर बंधूंच्या श्री मुरलीधर मंदिरात या जन्मोत्सवानिमित्त तीन दिवसीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. श्री रामकृष्ण सेवा मंडळाचे भक्तांनी श्री शाम नाम संकीर्तन तसेच कृष्ण पदांचे गायन केले. तत्पूर्वी सायंकाळी शंकराचार्य मठातील वेदमूर्ती गोविंदशास्त्री जोशी व त्यांच्या अकरा ब्रह्मावृंदांनी मंत्र जागर पठण केले. यावेळी पवमान पंचसूक्तचा अभिषेक करण्यात आला. मंदिरातील भव्य अशा संगमरवरी मूर्तीला आकर्षक भरजरी पोशाख घालण्यात आला होता. तसेच सुवासिक चाफा, गुलाब, शेवंती, मोगरा, निशिगंध आदी फुलांचे हार आणि विशेष करून देवाला आवडणारी तुळस मोठ्या प्रमाणात अर्पण करण्यात आली होती.
मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करून विविध रंगातील पडदे व फुलांच्या माळांनी भक्तांचे लक्ष वेधून घेतले जात होते. मंदिराच्या प्रांगणात काढलेली कृष्णाची विविध रंगातील देखणी रांगोळी ही तितकीच लक्ष वेधून घेणारी ठरत होती. दिवसभर श्रीकृष्ण भजने, भावगीते, भक्ती गीते तसेच नामवंत गायकांनी गायलेल्या गीतांचा यावेळी परिसरात सुरू असलेला नामघोष वातावरणात अधिकच धार्मिकतेचे रूप आणत होता. सकाळपासूनच या मंदिरात सातारा शहर परिसरातील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. सातारा शहर, फलटण, वाई, कोरेगाव, लोणंद, म्हसवड आदी भागांतही भगवान श्रीकृष्णाचा जन्म सोहळा शेकडो कृष्णभक्तांनी मोठ्या उत्साहात साजरा करत दहीहंडी फोडून काल्याचे कीर्तन होऊन या कार्यक्रमाची सांगता झाली.