उदयनराजे भोसले यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या सातारा लोकसभेची पोटनिवडणुकीदेखील विधानसभेच्या निवडणुकीसोबत पार पडणार आहे. राष्ट्रवादीतून भाजपात गेलेले उदयनराजे पुन्हा एकदा निवडणूक लढवणार असून आज शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे विधानसभेसाठी साताऱ्यातून शिवेंद्रराजे यांना उमेदवारी देण्यात येत असून उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांचं एकत्रित शक्तीप्रदर्शन सुरु आहे. शिवेंद्रराजे भोसले जावळी विधानसभा जागेसाठी अर्ज दाखल करणार आहेत.
यावेळी उदयनराजे भोसले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राजकारण हा माझा पिंड नाही. मी मुद्यांवर आधारित राजकारण करतो असं त्यांनी यावेळी सांगितलं. लोकांना आपली काम व्हावीत अशा अपेक्षा माझ्याकडून असून त्या पूर्ण करेन असं त्यांनी म्हटलं. याआधी आलेला अनुभव चांगला नव्हता असंही ते सांगायला विसरले नाहीत. आपल्याला कोणत्याही पदाची अपेक्षा नाही असंही ते म्हणाले आहेत.
यावेळी उदयनराजे यांनी आपल्या मतदारसंघात न झालेल्या कामांबद्दल पुन्हा एकदा भाष्य केलं. “माझ्या मतदरासंघात जी अनेक वर्षांपासून जवळपास १९९६ पासून कृष्णा खोऱ्याची जी मुलभूत कामं आहेत, ती मार्गी लागलेली नाहीत,” असं त्यांनी सांगितलं. तसंच “राजकारण हा माझा पिंड नाही. मी मुद्यांवर आधारित राजकारण करतो. कोणाला आवडलं, आवडलं नसेल तर मला काही समस्या नाही,” असंही यावेळी ते म्हणाले.
साताऱ्यात महाराज विरुद्ध महामहिम अशी रंगतदार लढत
सातारा लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाचे नेते व माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्याविरोधात राष्ट्रवादीकडून अखेर श्रीनिवास पाटील यांचे नाव अंतिम करण्यात आले. पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून नकार आल्याने राष्ट्रवादीने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाराज विरुद्ध महामहिम अशी रंगतदार लढत पाहायला मिळणार असून गुरुवारी श्रीनिवास पाटील उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.