सातारा : सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील पांडे गावात उभ्याचे नवरात्र नावाची परंपरा पाळली जाते. ही श्रद्धा इतकी विलक्षण आहे, की हे गावकरी हे नऊ दिवस रात्री उभ्याने वावरतात, जेवतात आणि झोपतातदेखील. या गावात तब्बल साडेतीनशे वर्षांपासून ही परंपरा पाळली जाते आहे.

पुणे- बंगळूर महामार्गापासून चार किलोमीटर अंतरावरील पांडे हे बारा बलुतेदारांचं गाव म्हणून ओळखले जाते. साडेतीनशे उंबरठे व सुमारे अडीच हजार लोकसंख्येच्या या गावात नवरात्रीवेळी काळ भैरवनाथ या ग्रामदैवताचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. यामध्ये उभ्याचे नवरात्र नावाची अनोखी उपासना गावातील अनेक भाविक करतात. दर वर्षी या गावातील ३५० ते ४०० लोक उपवास करतात. उपवास करणारे भाविक या नऊ दिवसांत उभ्याने वावरण्याचे व्रत पाळतात. आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी देवीला नवस केला जातो. आणि नवसासाठी हे कडक व्रत पाळले जाते. व्रताच्या स्मरणासाठी व आधारासाठी नवसकरी कायम हाती एक काठी बाळगतात. या काठीचा आधार घेत सगळे व्यवहार करतात अगदी झोपतातदेखील. या काळात हे भाविक तेल, मीठ, तिखटाचा पूर्णपणे त्याग करतात. फराळ म्हणून साधा आहार, फळे आणि दूध घेतात. दिवसभर भजन, कीर्तन आरत्यांमध्ये वेळ घालवतात. रात्री हे उपासक भैरवनाथ व विठ्ठल या मंदिरात बांधलेल्या पाळण्यावर छाती टेकवून एक पाय वर करून उभे राहूनच झोपतात. या आगळ्यावेगळ्या नवरात्रात गावातील हिंदू-मुस्लिम दोन्हीही समाज आनंदात सहभागी होतो. पांडे गावातील या आगळ्यावेगळ्या ‘उभ्याचे नवरात्र’ परंपरेची सर्वत्र चर्चा असते.

सुमारे अडीच हजार लोकसंख्येच्या या गावात नवरात्रीवेळी काळ भैरवनाथ या ग्रामदैवताचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. यामध्ये उभ्याचे नवरात्र नावाची अनोखी उपासना गावातील अनेक भाविक करतात. दर वर्षी या गावातील ३५० ते ४०० लोक उपवास करतात. उपवास करणारे भाविक या नऊ दिवसांत उभ्याने वावरण्याचे व्रत पाळतात.

नवरात्रात घटस्थापनेपासून उभ्याच्या नवरात्राचे व्रत सुमारे साडेतीनशे वर्षांपासून अखंडितपणे सुरू असून, ज्या भक्तांनी ग्रामदैवत काळभैरवनाथाला नवस बोलले आहेत, ते नऊ दिवस सलग उभे राहून आपला नवस पूर्ण करतात. घटस्थापनेपासून सुरू होणारे हे खडतर व्रत थेट विजयादशमीला (दसरा) उपवास सोडल्यानंतर पूर्ण होते असे पांडे (ता. वाई) गावचे सरपंच किरण जाधव यांनी सांगितले.