सातारा : सातारा जिल्ह्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तब्बल १,५८३ जणांवर कारवाई केली आहे. याशिवाय मिरवणुकांवर ‘ड्रोन’द्वारे नजर ठेवली जाणार आहे. दरम्यान, जिल्ह्यात ५४२ गावांत ‘एक गाव एक गणपती’ बसवला जात आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी प्रतिबंधात्मक उपायांची माहिती दिली. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत १ हजार ४६५ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे, तर १०३ सराइतांना गणेशोत्सव कालावधीमध्ये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कायद्यान्वये तात्पुरते तडीपार करण्यात आले आहेत. महाराष्ट्र पोलीस अधिनियमान्वये १५ जणांना तडीपार करण्यात आले आहे. याशिवाय दारूबंदीचे ३१ प्रस्तावही दाखल करण्यात आले आहेत.

गणेशोत्सवाच्या अनुषंगाने सातारा पोलीस दल सतर्क झाले आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी तात्पुरती तडीपारी व प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे. याशिवाय दारूबंदीचे ३१ प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत. आतापर्यंत १४६५ जनावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. तसेच १०३ संशयित आरोपींना गणेशोत्सव कालावधीकरिता तात्पुरते तडीपार करण्यात आले आहे. १५ जणांना तडीपार करण्यात आले आहे. सातारा जिल्ह्यात पोलीस दलाच्या वतीने सातारा शहर, कराड शहर, फलटण, वाई या प्रमुख शहरांसह संपूर्ण जिल्ह्यामध्ये दंगल नियंत्रित योजना रंगीत तालीम व फेरी, गुन्हेगारी जागांवर छापेमारी करण्यात आली आहे.

गणेशोत्सव अनुषंगाने जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी सातारा शहर, कराड शहर या प्रमुख शहरांमध्ये शांतता कमिटीची बैठक घेतली आहे. सातारा शहरासह जिल्ह्यात ध्वनिप्रदूषण कायद्याखाली दिलेल्या मर्यादेचे उल्लंघन झाल्यास नागरिकांनी त्यांच्या तक्रारी ११२ क्रमांकावर कराव्यात, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. तसेच सर्व गणेशोत्सव मंडळांनी ध्वनिप्रदूषण कायद्यान्वये दिलेल्या सूचनांचे पालन करावे अन्यथा पोलीस कारवाई करणार आहेत, असे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी सांगितले.

मोठा बंदोबस्त

गणपती, तसेच ईद-ए-मिलाद या सणांसाठी जिल्ह्यात एक पोलीस अधीक्षक, एक अपर पोलीस अधीक्षक, आठ पोलीस उपाधीक्षक व १४० पोलीस अधिकारी, १,८४० पोलीस अंमलदार, एक राज्य राखीव पोलीस दलाचे पथक (एसआरपीएफ कंपनी), तीन जलद कृतिदल पथक, १,१०० गृहरक्षक असे मनुष्यबळ बंदोबस्तासाठी तैनात असणार आहे. जिल्ह्यामध्ये निघणाऱ्या मिरवणुका व इतर कार्यक्रमांवर ठिकठिकाणी ‘सीसीटीव्ही कॅमेऱ्यां’सह सात ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवले जाणार आहे.