कराड : कराड व लगतच्या मलकापूर शहर परिसराची मंगळवारी सायंकाळी सव्वापाचपासून सुरू झालेल्या सोसाट्याचे वारे, जोरदार विजा, गारपीट अन् बेसुमार पावसाने दैना उडवून दिली. शेजारच्या प्रदेशातही अशीच स्थिती असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, अंधाराच्या साम्राज्यात ठिक-ठिकाणी झाडे उन्मळल्याने तसेच पाणी तुंबल्याने पुणे- बंगळूरू महामार्गासह अन्य मार्गही ठप्प झाल्याने वाहनधारक व प्रवाश्यांचे प्रचंड हाल झाले.

कमालीच्या उष्म्यानंतर कोसळलेल्या बेसुमार पावसाने अक्षरशः दाणादाण उडाली. गारांचा खच साचला. झाडे उन्मळली, विजेचे खांब वाकले, कच्ची घरे, झोपड्या जागीच झोपल्या. सर्वत्र पाणीच पाणी आणि अंधाराचे साम्राज्य पसरल्याने समाजमन भयभीत झाले. अनेक ठिकाणी स्थावर मिळकतीचेही नुकसान झाले. काढणी न झालेल्या ज्वारी व गव्हासह भाजीपाल्याचेही नुकसान झाल्याचे तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय खरात यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले. दरम्यान, पावसाने वातावरणात गारवा पसरल्याने उष्णतेने हैराण जीवांना दिलासा मिळाला. लहान मुले व युवकांनी पावसात भिजत गारा वेचण्याचा आनंद लुटला.

अचानक आलेल्या तुफान वादळी वाऱ्यातील पावसाने नोकरीवरून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांसह शाळेहून घरी परतणारे विद्यार्थी, छोटे उद्योजक अन् लोकांची एकच तारांबळ उडाली. शहरातील वाहतूकही विस्कळीत झाली. छत्रपती शिवाजी स्टेडीयमला भव्य तळ्याचे स्वरूप आले होते. कराडच्या भाजी मंडईतील छोट्या विक्रेत्यांसह व्यापारांचीही तारांबळ घडली.

शिवतीर्थ दत्त चौकातील कलिंगड विक्रेत्यांची कलिंगड रस्त्यावरील वेगाने वाहणाऱ्या पाण्यात वाहत गेली. त्यांची जमवाजमव करून बाकीचा माल वाचवण्यासाठी या विक्रेत्यांची कसरत दिसून आली. सव्वा तासानंतर पावसाचा जोर ओसरल्याने शहरातील विस्कळीत वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचे चित्र आहे.

पंचतारांकित हॉटेलच्या काचा फुटल्या

पुणे- बंगळुरू महामार्गावर गोटे (ता. कराड) येथील एका पंचतारांकित हॉटेलच्या दर्शनी भागातील काचा गारपीट आणि सोसायट्याच्या वाऱ्यामुळे फुटल्या. हॉटेलमध्ये पावसाचे पाणी शिरून नुकसान झाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गारा वेचण्याचा आनंद

कराड, मलकापूर परिसरातील तुफान पावसात सलग १५ मिनिटे गारांचा मारा झाला. सर्वत्र गारांचा खच साचताना, लहान मुले, युवकांनी पावसात भिजत गारा वेचण्याचा आनंद लुटला.