सातारा : रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, पद्मभूषण कर्मवीर डॉ. भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाच्या निमित्ताने खासदार शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा एकत्र येणार आहेत.शरद पवार साताऱ्यात आज गुरुवारी सायंकाळी दाखल झाले आहेत. शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार येणार आहेत. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या एकत्रीकरणाच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर हे दोघे एकत्र येत असल्याने या कार्यक्रमाकडे लक्ष लागले आहे.

कर्मवीर डॉ. भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमात पुन्हा शरद पवार, अजित पवार एकाच मंचावर बसणार आहेत. एक महिन्यापूर्वी रयत शिक्षण संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीला शरद आणि अजित पवार एकत्र आले होते. दोघांमध्ये संस्थेच्या अनुषंगाने काही चर्चाही झाली होती.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील यांनी साताऱ्यात पक्षबांधणी सुरू केली आहे. कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी आणि कार्यक्रमांना उपस्थिती असा दौरा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिन्यात दुसऱ्यांदा आयोजित केला आहे.