सातारा : वाई-खंडाळा आणि महाबळेश्वर तालुक्यातील भूमिगत वीजवाहिनी टाकण्याच्या कामांना १५ व्या वित्त आयोगातून ३९.८३ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. याबाबत मदत आणि पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांनी पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्यातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या निधीला मंजुरी दिली आहे. लवकरच या कामाची निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे.
़
वाई, महाबळेश्वर या परिसरात दरवर्षी मुसळधार पाऊस होत असतो. याशिवाय या परिसरात मोठ्या प्रमाणात झाडे व जंगल आहे. पावसाळ्यात या परिसरात वीजवाहक खांब उन्मळून पडतात व वाहिन्या तुटतात. मोठमोठ्या झाडांमुळे वीजवाहिन्या तुटतात. त्यामुळे अनेकदा या भागात वीजपुरवठा खंडित होतो. स्थानिकांना आणि या परिसरात आलेल्या पर्यटकांना खूप मोठ्या मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. त्यामुळे महाबळेश्वरच्या दुर्गम भागात अनेक दिवस वीज पुरवठा खंडित होत असतो. वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी अनेक दिवस कष्ट घ्यावे लागतात.
यासाठी राज्य आपत्ती सौम्यीकरणांतर्गत महावितरण कंपनीकडून जिल्ह्यातील वाई, महाबळेश्वर व खंडाळा तालुक्यातील भूमिगत वीजवाहिनी टाकण्याच्या कामासाठी मंत्री पाटील यांनी पुढाकार घेऊन याबाबतचा प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावास मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मान्यता देण्यात आली होती. हा प्रस्ताव राज्य कार्यकारी समितीपुढे ठेवण्यात आला होता. या समितीच्या बैठकीत या प्रस्तावास मान्यता दिली होती. त्यानुसार १५ व्या वित्त आयोगाने मंजूर केलेल्या राज्य आपत्ती सौम्यीकरण निधीतून जिल्ह्यातील वाई व महाबळेश्वर तालुक्यातील बारामती व सातारा मंडळांतर्गत भूमिगत वीजवाहिनीच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यासाठी मंत्री पाटील यांनी पाठपुरावा केला होता.
यामध्ये लोणंद पालिकांतर्गत भूमिगत वीजवाहिनी टाकणे १२.२२ कोटी, महाबळेश्वर शहरातील भूमिगत वीजवाहिनी टाकणे ८.०५ कोटी, पाचगणी शहरातील कामांसाठी ९.५५ कोटी तसेच वाई शहरात भूमिगत वीजवाहिनी टाकणे आणि खांब उभारणे १०.०१ कोटी रुपयांच्या निधीचा समावेश आहे. १५ व्या वित्त आयोगातून या कामासाठी एकूण ३९.८३ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. याबाबत मदत आणि पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांनी पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्यातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या निधीला मंजुरी दिली आहे. लवकरच या कामाची निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे.