Supriya Sule : सातारा जिल्ह्यामधील फलटण शहरातील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याची घटना घडली. या मृत महिला डॉक्टरने आत्महत्येपूर्वी स्वत:च्या तळहातावर सुसाइड नोट लिहिली होती. त्यामध्ये दोन जणांवर मानसिक छळाचे गंभीर आरोप केले. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींना अटक केलं.
दरम्यान, या प्रकरणात आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आज खासदार सुप्रिया सुळे यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेत या घटनेबाबत काही महत्वाचे सवाल उपस्थित केले आहेत. या प्रकरणातील सीडीआर रिपोर्ट लीक कसा झाला? असा सवाल उपस्थित करत या प्रकरणाचा तपास निवृत्त न्यायाधीशांमार्फत करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
“एक माणुसकीच्या नात्याने या घटनेकडे पाहिलं पाहिजे. सरकारमधील काही नेत्यांकडून अतिशय असंवेदनशीलपणे काही विधाने करण्यात येत आहेत, हे अतिशय दुर्देवी आहे. या घटनेतील मुलगी कर्तुत्वान मुलगी होती. दुर्देवाने कुठेतरी हे प्रकरण दडपून टाकण्याचा प्रयत्न होत असल्याची भावना लोकांमध्ये आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी फलटणच्या प्रकरणात एसआयटीची स्थापना करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र, मृत महिला डॉक्टरांच्या कुटुंबियांशी आम्ही बोललो तेव्हा समजलं की पूर्ण विशेष तपास पथकाची नियुक्ती करण्यात आलेली नाही”, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
“महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माझी हात जोडून विनंती आहे की एक एसआयटी स्थापन करा आणि त्या एसआयटीची जबाबदारी एका निवृत्त न्यायाधीशांकडे देऊन या प्रकरणाचा तपास करा. पीडित कुटुंबियांना न्याय देण्याची नैतिक जबाबदारी राज्य सरकारसह आपल्या सर्वांची आहे”, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
“खासदार बजरंग सोनवणे आता दिल्लीत जातील तेव्हा ते गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन या प्रकरणातील वास्तव ते त्यांना सांगतील. राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे की कोणत्याही राजकीय दबावाखाली येऊ नका. महाराष्ट्राच्या लेकीला न्याय मिळाला पाहिजे. आम्ही माणुसकीच्या नात्याने या पीडित कुटुंबियांबरोबर आहोत. कोणत्याही गुन्ह्यात ज्याने कोणी जो गुन्हा केला, अशा प्रकरणांमध्ये कोणताही राजकीय दबाव नसला पाहिजे, ज्याने गुन्हा केला, त्याला शिक्षा झाली पाहिजे”, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.
“तसेच फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील सीडीआर रिपोर्ट हा लीक कसा झाला? त्याहीपुढे हा सीडीआर रिपोर्ट ठरावीक लोकांना कसा समजला? आरोप-प्रत्यारोप झाले, मग ती मुलगी कोणाची तरी लेक आहे ना, तरीही तुम्ही अशा प्रकारचे विधाने करता?”, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी टीका केली.
