Phaltan Doctor Suicide Case: सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात असलेल्या उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात नवनवीन माहिती समोर येत आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आज फलटणला भेट देऊन या प्रकरणाचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पोलिसांसह पत्रकार परिषद घेऊन महिला डॉक्टरच्या आत्महत्येपूर्वी काय घडले? याची माहिती दिली. दरम्यान या प्रकरणात महिला डॉक्टर आणि पोलिसांनी यापूर्वी एकमेकांविरोधात तक्रार दाखल केल्याचे चाकणकर यांनी निदर्शनास आणून दिले. यातील पहिली तक्रार डॉक्टरांकडून करण्यात आली होती.

सदर प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदनेला चौकशीसाठी ताब्यात घेतलेले आहे. बदने आणि डॉक्टर महिलेमध्ये जानेवारी ते मार्च दरम्यान फोनवरून संभाषण झाले होते. मात्र मार्चनंतर त्यांच्यात कोणताही संवाद झाला नव्हता, अशी माहिती रुपाली चाकणकर यांनी दिली.

बदली नाकारली

रुपाली चाकणकर पुढे म्हणाल्या की, पोलीस आणि संबंधित डॉक्टरांनी एकमेकांवर आरोप केले होते. अहवाल देण्यात दिरंगाई, उशिरा आलेल्या रुग्णांवर उपचार देण्यावरून आक्षेप, रात्री आरोपी आणले जातात अशाप्रकारचे आरोप महिला डॉक्टरच्या वतीने करण्यात आले होते. तर या प्रकरणी नेमलेल्या चौकशी समितीने डॉक्टरांची बदली करण्याची शिफारस केली होती. मात्र तरीही संबंधित महिला डॉक्टरने फलटण उपजिल्हा रुग्णालयातच काम करण्याचा आग्रह केला.

त्या रात्री काय घडले?

महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात त्या ज्या घरात भाड्याने राहत होत्या, त्या घरमालकाचा मुलगा प्रशांत बनकरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्रशांतच्या नावाचा उल्लेख महिला डॉक्टरने तळहातावर केला होता. बनकर यांच्याकडे भाड्याने राहणाऱ्या महिला डॉक्टर हॉटेलमध्ये कशा काय गेल्या? असा एक प्रश्न निर्माण होत होता. यावर उत्तर देताना रुपाली चाकणकर म्हणाल्या, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी महिला डॉक्टर बनकर यांच्या घरी होत्या. फोटो काढण्यावरून त्यांच्यात वाद झाला. त्या वादाचे रुपांतर मोठ्या भांडणात झाले.

रुपाली चाकणकर पुढे म्हणाल्या, प्रशांत बनकरशी भांडण झाल्यानंतर महिला डॉक्टर एका मंदिराच्या ठिकाणी गेल्या. तिथे प्रशांत बनकरच्या वडिलांनी समजूत घातल्यानंतर त्या हॉटेलमध्ये राहण्यासाठी निघून गेल्या. त्या रात्री त्यांनी रात्रभर प्रशांत बनकरला मेसेज केले. मात्र प्रशांत बनकरचा फोन बंद होता. त्या मेसेजमध्ये त्यांनी आत्महत्या करण्याची धमकी दिली होती.

आज शवविच्छेदन अहवाल मिळण्याची अपेक्षा आहे. त्यातून बऱ्याच गोष्टी समोर येतील, असेही चाकणकर म्हणाल्या. तसेच प्रशांत बनकर, महिला डॉक्टर यांच्या फोनची तपासणी केली जात आहे. सीडीआरच्या माध्यमातूनही बऱ्याच गोष्टी समोर येतील, असेही चाकणकर म्हणाल्या.