“खासदार संभाजीराजे हे छत्रपती घराण्यातील असल्याने ते आपल्या पक्षात यावे असे प्रत्येक पक्षाला वाटणे स्वाभाविक आहे,” असं मत व्यक्त करत गृहराज्यमंत्री आणि काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी सूचक वक्तव्य केलंय. त्यामुळे संभाजीराजे छत्रपती यांच्या नवी राजकीय वाटचालीबाबत चर्चांना उधाण आलंय. यावेळी सतेज पाटील यांनी खासदार संभाजीराजे यांच्याशी राजकीय चर्चा झाली नसल्याचेही नमूद केले. तसेच ते काँग्रेस पक्षाशी हातमिळवणी करणार नाही, असेही स्पष्ट केले. ते सोमवारी (२ मे) कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

खासदार संभाजीराजे यांनी ३ मे रोजी राज्यसभेच्या खासदारकीची मुदत संपल्यानंतर नवी राजकीय भूमिका जाहीर करणार असल्याचे घोषित केले आहे. त्यांच्या नव्या वाटचालीच्या अनुषंगाने विचारणा केली असता मंत्री सतेज पाटील म्हणाले, “संभाजीराजे यांच्याशी मराठा आंदोलन, सारथी, मराठा आरक्षण, शाहू स्मृती शताब्दी कार्यक्रमासाठी राष्ट्रपतींना निमंत्रित करणे आदी प्रश्नांवर चर्चा झाली. ते छत्रपती घराण्यातील असल्याने प्रत्येक पक्षाला आपल्या पक्षात यावे असे वाटण्यात काही गैर नाही. यापूर्वीही त्यांनी राष्ट्रवादीकडून लोकसभेची निवडणूक लढवलेली आहे.”

“….म्हणून मालोजीराजे काँग्रेस पक्षात सक्रीय”

राजकारणापासून दूर असणारे मालोजी राजे काँग्रेस पक्षात सक्रिय कसे झाले? असे विचारले असता सतेज पाटील म्हणाले, “कोल्हापूर पोटनिवडणूक वेळी विशिष्ट परिस्थिती निर्माण झाली होती. यासाठी मी स्वतः त्यांच्या घरी जाऊन त्यांना भेटून काँग्रेसचा प्रचार करण्याची विनंती केली. त्यांनी ही विनंती स्वीकारल्याने काँग्रेस उमेदवार निवडून येण्यास फायदा झाला.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शाहुराजांचे स्मारक साकारणार

“शाहू मिलमध्ये राजर्षी शाहू महाराज यांचे स्मारक साकारण्याचा आराखडा तयार आहे. शासन निधीची उपलब्धता करत असून कामाला लवकरच सुरुवात केली जाईल. त्यातील ७० टक्के भाग वारसाहक्क जागेत येत नसल्याने काम गतीने पूर्ण होईल. कसबा बावडा येथील शाहू जन्मस्थळ विकसित करण्याच्या कामात वारसाहक्क स्थळाच्या जागेचे प्रश्न होता. त्याचे निराकरण झाले असल्याने तेही काम गतीने पूर्ण होईल,” असा विश्वास सतेज पाटील यांनी व्यक्त केला.