कराड : पाटण विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासह आगामी राजकीय ध्येयधोरणे ठरवण्यासाठी माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज सोमवारी पाटणमध्ये पाटणकर गटाच्या झालेल्या बैठकीत पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये समावेशाची जोरदार मागणी करताना, सत्ता नसल्याने त्रास, अन्याय झाल्याची भावना व्यक्त केली. मात्र, विक्रमसिंह आणि त्यांचे पुत्र सत्यजितसिंह यांनी राजकीय वाटचाल स्पष्ट न करता याबाबतची उत्सुकता कायम ठेवली आहे. मात्र, या संपूर्ण घडामोडी ज्येष्ठ नेते, खासदार शरद पवार यांना धक्का देणाऱ्या ठरल्या आहेत.
शिवसेना नेते, राज्याचे पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांच्या वाढत्या राजकीय दबदब्यामुळे पाटणकर गटाची घुसमट झाली आहे. अशातच नशिबी सलग पराभव येत असल्याने पाटणकर हे शरद पवारांशी फारकत घेवून सत्तेत पुन्हा जाण्यासाठी नवी राजकीय वाटचाल घोषित करणार असल्याचे त्यांच्या समर्थकांमधून बोलले जात होते. त्यावर आजच्या बैठकीत चर्चा होवून पाटणकर हे परंपरेनुसार शरद पवार यांच्या सोबतच राहणार की, अजित पवार किंवा भाजप सोबत जाणार याची एकच चर्चा होती. अनेक तर्क बांधले जात होते. राजकीय वर्तुळाच्या या बैठकीकडे नजरा लागून होत्या.
दरम्यान, अलीकडेच विक्रमसिंहांचे पुत्र सत्यजितसिंह यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यासमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून भाजप प्रवेश निश्चित केल्याच्या छायाचित्रासह बातम्याही आज प्रसिद्ध झाल्या होत्या. सातारच्या राजकारणातील राजे गटाने पाटणकर यांना भाजपच्या सत्तेत आणण्याचा हा प्रयत्न असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. त्यानुसार आजच्या बैठकीची औपचारीकता पार पाडत भाजपचे कमळ हाती घेण्याचा निर्णय अपेक्षित मानला जात होता. मात्र, राजकीय वाटचाल गुलदस्त्यात ठेवून पाटणकर यांनी हा विषय चर्चेतच ठेवला आहे. सत्यजितसिंह यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी पूर्वी योग्य निर्णय होईल असे या वेळी स्पष्ट केले आहे. तर, भाजप प्रवेश निश्चित असल्याचे पाटणकर गटाचे नेते उघडपणे सांगत आहेत.
या बैठकीला स्वतः विक्रमसिंह पाटणकर. त्यांचे पुत्र, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर, हिंदुराव पाटील, याज्ञसेन पाटणकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पाटण तालुक्यात गेल्या पंधरा वर्षात दबावाचे राजकारण करत आपल्या कार्यकर्त्यांची केवळ पिळवणूक झाली. कार्यकर्त्यांना वेठीस धरून प्रवेश करून घेतले गेले. धरणांची कामे, वन्यप्राण्यांचा त्रास, रस्त्यांची दुरवस्था आदी विकासकामे रखडली असून सर्वसामान्यांच्या हिताचे कोणतेही निर्णय झाले नाहीत. हुकूमशाही प्रवृत्तीने कार्यकर्त्यांवर आजपर्यंत अन्यायच झाला. त्यामुळे तालुक्याच्या नवीन विकासाच्या संकल्पनांच्या मागे जावे लागणार आहे. त्यासाठी सत्यजितसिहांच्या नेतृत्वासाठी आपल्या सर्वांना भाजपासोबत सत्तेत जावेच लागेल, अशा भावना पाटणकर गटाच्या कार्यकर्त्यांनी बैठकीत बोलताना व्यक्त केल्या. यावर कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेवून सर्वांना विश्वासात घेत योग्य तो निर्णय लवकरच आपण घेवू असा विश्वास देत सत्यजितसिंह पाटणकर यांनी भाजप की अजित पवारांसोबत जायचे हा निर्णय तूर्तास पुढे ढकलला.