धवल कुलकर्णी

महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीमधल्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबाबतच्या मतभेदांचा फायदा घेऊन सरकारला कात्रीत पकडण्याचा प्रयत्न करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने सावरकरांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव ठेवण्याबाबतची सूचना विधिमंडळामध्ये उपस्थित केली. मात्र विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी ही सूचना फेटाळून लावली.

याबाबत सभागृहामध्ये चर्चा सुरू असताना उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी सावरकरांच्या स्वातंत्र्य चळवळीबाबतच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करताना माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सावरकरांना भारतरत्न देण्याबाबतचे पत्र पाठवले होते, चे काय झाले असा प्रश्न विचारून भाजपलाच खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला. तसेच राज्याचे संसदीय कार्य मंत्री अनिल परब यांनीही सावरकरांना भारतरत्न देण्याबाबतच्या मागणीची आठवण भाजप नेत्यांना करून दिली आणि ते झाल्यावर तुमच्या आणि मोदी साहेबांचे धन्यवाद करणारा प्रस्ताव आम्ही मांडू, असा टोला लगावला.

अध्यक्ष पटोले यांनी ठरावाची सूचना फेटाळल्यानंतर भाजपच्या आमदारांनी काही काळ सभागृहांमध्ये याबाबतचे बॅनर फडकवले. त्यानंतर झालेल्या गोंधळामध्ये सरकारने काही विधेयक मंजूर करून घेतली आणि सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब झाले.

काही भाजपच्या आमदार सावरकरांच्या स्मृतिदिनानिमित्त सभागृहामध्ये भगव्या टोप्या परिधान करून आले होते. तत्पूर्वी विधानसभेच्या सभागृहाबाहेर ठेवलेल्या सावरकरांच्या फोटोला राज्याचे महसूल मंत्री आणि काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी पुष्प वाहून आदर व्यक्त केला.

सदरील सूचना सभागृहामध्ये मांडताना माजी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सावरकरांच्या राष्ट्रभक्तीचा आणि देशासाठी केलेल्या कार्याचा उल्लेख केला. तसेच सरकारने हे सभागृह सावरकर यांच्या कार्याचा गौरव करत आहे, असा दोन ओळींचा गौरव प्रस्ताव मांडून सावरकरांना आदरांजली वाहावी, अशी मागणी सुद्धा मुनगंटीवार यांनी केली. “सावरकर हे जाज्वल्य राष्ट्रभक्त होते त्यांच्यामध्ये देशसेवेचे स्फुल्लिंग होते, त्यांच्यावर इंग्रजांनी अनन्वित अत्याचार केले. सावरकरांना अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह यामधल्या सेल्युलर जेलमध्ये जरी ठेवण्यात आले असते तरी सुद्धा त्यांचा देशाभिमान तसूभरही कमी झाला नव्हता,” या मुद्द्यांबाबत मुनगंटीवार यांनी निवेदन केले. स्वातंत्र्य चळवळीमध्ये सावरकरांसारख्या एका मराठी माणसाने केलेले हे कार्य गौरवास्पद आहे, असे सुद्धा मुनगंटीवार यांनी म्हटले.

याबाबत बोलताना फडणवीस यांनी सरकारवर चौफेर हल्ला चढवला. सावरकरांच्या गौरव बाबत सरकारने दोन ओळींचा प्रस्ताव सरकारने मांडावा. काँग्रेस पक्षाचे मुखपत्र असलेल्या ‘शिदोरी’मध्ये सावरकरांची माफिन म्हणून निर्भत्सना करण्यात आली आणि त्यांच्यावर बलात्कारी असल्याचा शिक्का लावण्यात आला त्यामुळे सरकारने पहिल्यांदा ‘शिदोरी’वर बंदी घालावी, अशी मागणीसुद्धा त्यांनी केली.

हा स्वातंत्र्यवीरांचा पहिला स्मृतिदिन नाही, असे सांगत उपमुख्यमंत्री पवार यांनी आम्हीसुद्धा सावरकरांना मानतो असे म्हटले. नरेंद्र मोदी हे पाच वर्ष भारताचे पंतप्रधान होते आणि आत्तासुद्धा आहेत. ऑगस्ट 2018 आणि जानेवारी 2019 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोदींना पत्र लिहून सावरकरांना भारतरत्न द्यावे अशी मागणी केली होती. तरीसुद्धा सावरकरांना अजूनपर्यंत भारतरत्न का देण्यात आले नाही हे सभागृहाला कळले पाहिजे. “आम्हीसुद्धा स्वातंत्र्यवीर सावरकरांना मानतो… लोकांची वेगळी मतं असू शकते. सावरकर हे विज्ञानवादी होते त्यांनी गाईंच्या आणि बैलांच्याबाबत वेगळ्या भूमिका घेतल्या होत्या,” असे पवार यांनी नमूद केले.

‘भारतरत्न’बाबतचा प्रस्ताव पंतप्रधानांना पाठवण्यात आला असून, आपण सर्वांनी त्याचा पाठपुरावा केला पाहिजे, असे पवार म्हणाले.