सावंतवाडी: सावंतवाडी नगरपरिषद हद्दीतील ज्या इमारतींच्या बांधकामाला ३० वर्षांहून अधिक काळ लोटला आहे, अशा इमारती आता धोकादायक स्थितीत गणल्या जाणार आहेत. महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ च्या कलम १९३ अ नुसार, या इमारतींच्या मालकांनी किंवा भोगवटेदारांनी नोंदणीकृत बांधकाम अभियंत्यांकडून (स्ट्रक्चरल इंजिनियर) इमारतीच्या बांधकामाचे सुरक्षिततेबाबतचे प्रमाणपत्र प्राप्त करून ते नगरपरिषद कार्यालयात सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
सावंतवाडी नगरपरिषदेच्या प्रशासनाकडून इमारतीच्या सुरक्षिततेची खात्री झाल्यानंतरच त्या इमारती भोगवटेदारांसाठी सुरक्षित समजल्या जातील. याउलट, ज्या इमारती मोडकळीस आलेल्या आहेत, भागांमध्ये दुरवस्था झाली आहे किंवा त्या पडण्याच्या स्थितीत आहेत, अशा इमारतींचे सर्वेक्षण नगरपरिषदेमार्फत केले जाणार आहे. त्यानंतर, महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ च्या कलम १९५ अन्वये नगरपरिषदेच्या पूर्वनियोजित तपासणीत अशा धोकादायक इमारती दुरुस्त करण्याची किंवा त्या पूर्णपणे काढून टाकण्याची कार्यवाही केली जाईल, अशा सूचना नगरपरिषदेने जारी केल्या आहेत.
या सूचनांचे पालन न करणाऱ्या इमारतींमुळे कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्यास त्याचे सर्वस्वी जबाबदार संबंधित इमारतीचे मालक किंवा भोगवटेदार राहतील, याची नोंद घ्यावी, असे नगरपरिषदेने स्पष्ट केले आहे. भविष्यात अशा धोकादायक इमारतींमुळे कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडल्यास सावंतवाडी नगरपरिषद त्याची जबाबदारी घेणार नाही, असेही नोटिसीत नमूद करण्यात आले आहे.या संदर्भात अधिक माहितीसाठी सावंतवाडी नगरपरिषदेच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन मुख्याधिकारी अश्विनी पाटील यांनी केले आहे.