​सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषद सफाई कर्मचाऱ्यांचा पीएफ फंड गेल्या तीन ते चार वर्षांपासून थकविणाऱ्या ठेकेदारा विरोधात गुन्हा दाखल करण्याचा निर्णय प्रशासक तथा प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी घेतल्यानंतर सफाई कामगारांनी काम बंद आंदोलन मागे घेतले.

सावंतवाडी नगरपरिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी पुकारलेला तीन दिवसांचा संप अखेर मागे घेण्यात आला आहे. प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी कंत्राटदाराकडून कर्मचाऱ्यांचे थकीत पीएफचे पैसे तात्काळ भरून घेण्याचे आणि पैसे बुडवणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या पुढाकाराने झालेल्या बैठकीत हा तोडगा निघाला.

​गेल्या तीन ते चार वर्षांपासून कंत्राटदाराने सफाई कर्मचाऱ्यांचा पीएफ फंड थकवल्याने कर्मचारी संपावर गेले होते. या संपावर तोडगा काढण्यासाठी प्रांताधिकारी कार्यालयात एक बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रांताधिकारी हेमंत निकम आणि तहसीलदार श्रीधर पाटील यांच्यासह माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी नगरसेवक विलास जाधव, सुरेश भोगटे,अभय पंडित, दीपक सावंत, मनोज घाटकर तसेच न.प. चे अधिकारी वैभव अंधारे, प्रसाद बटवाल, आरोग्य निरीक्षक विनोद सावंत, दीपक म्हापसेकर आदींसह कंत्राटी सफाई कर्मचारी उपस्थित होते.

​थकीत पीएफ: कंत्राटदाराने अनेक वर्षांपासून पीएफचे पैसे जमा केले नाहीत.

​वेतन तफावत: १९,५०० रुपये मानधन ठरलेले असतानाही केवळ १५,५०० रुपये दिले जातात. सफाई कामगार आणि ड्रायव्हर यांच्या वेतनातही तफावत आहे. कर्मचाऱ्यांना पगार चिठ्ठी किंवा पगार पावती दिली जात नाही.

​या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या समस्या ऐकून घेतल्यानंतर प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले. ते म्हणाले, “कामगारांचे पीएफचे पैसे भरल्याशिवाय कंत्राटदाराशी पुढील व्यवहार करू नयेत. तसेच पैसे बुडवणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात येईल.” त्यांनी गुरुवारी यासंदर्भात बैठक घेऊन हा प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन दिले.

​यासोबतच, नगरपरिषदेच्या ३८ सफाई कर्मचाऱ्यांसाठी नवीन टेंडर काढण्यात येत असून, नवीन दरानुसार कर्मचाऱ्यांना ७६५ रुपये आणि ड्रायव्हर्सना ९४९ रुपये देण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी सादर केला जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

​माजी नगराध्यक्ष साळगावकर यांची भूमिका:

​या यशस्वी मध्यस्थीबद्दल बोलताना माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर म्हणाले, “सणासुदीच्या काळात शहरात कचरा साचणे योग्य नव्हते, त्यामुळे प्रांताधिकाऱ्यांशी समन्वय साधून हा प्रश्न सोडवणे आवश्यक होते. कामगारांच्या घामाचा पैसा त्यांना मिळालाच पाहिजे. पीएफ बुडवणाऱ्या ठेकेदाराला पैसे न दिल्यास गुन्हा दाखल करण्याचे आदेश प्रांतांनी दिले आहेत.”

​प्रांताधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्यानंतर संध्याकाळपासूनच सावंतवाडी शहर स्वच्छ करण्याचे काम पुन्हा सुरू झाले आहे.

यावेळी स्वच्छता कर्मचारी बाबू बरागडे, राजू मयेकर, रवी कदम, नितीन पोखरे , लाखे यांच्यासहित कामगार उपस्थित होते. त्यांनी कामगारांची बाजू मांडली. गेल्या दोन दिवसांपासून संपावर असलेले कर्मचारी संध्याकाळपासून कामाला लागले आहेत.