सावंतवाडी: गेल्या काही दिवसांपासून सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली,वाफोली,कास परिसरात धुमाकूळ घालणारा आणि रस्त्यावरून फिरताना दिसणारा ‘ओंकार’ हत्ती सध्या चर्चेचा विषय बनला आहे. हत्ती पकड मोहीम सरकारने जाहीर करूनही थंडावली असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे, तर दुसरीकडे ओंकारला पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी उसळत आहे.
ओंकार हत्तीचा अक्षरशः ‘फुटबॉल’ झाला असून, तो दिवसभर वाफोली,इन्सुली आणि पुन्हा इन्सुली परिसरात फिरत आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील इन्सुली गावात शनिवारी सायंकाळी आणि रविवारी सकाळी त्याचा वावर दिसून आला. त्याने महामार्ग ओलांडून तेरेखोल नदी पात्रातून तो वाफोली येथे गेला. बांदा पानवळ राम मंदिरापर्यंत दोडामार्ग दिशेने जाऊन तो पुन्हा मागे फिरला आणि तेरेखोल नदी पात्रातून इन्सुली येथे परत आला.
कर्मचारी हैराण, वरिष्ठ एसीमध्ये:
ओंकार हत्तीच्या मागे पुढे वन कर्मचारी आणि हाकारे देणारे वावरत आहेत. पोलिसही तैनात करण्यात आले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून वन कर्मचारी हैराण झाले आहेत, मात्र वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी एसीमध्ये बसून धोरण ठरवत असल्याचे चित्र आहे. ओंकार हत्ती माणसाळल्यासारखा वागतोय. अजून तरी त्याने वैतागून लोकांवर धावून जाण्याचा प्रयत्न केलेला नाही.
बघ्यांची गर्दी, भीतीचे वातावरण:
कास, मडुरा, रोणापाल, इन्सुली आणि वाफोली परिसरात रस्त्यावरून फिरताना ओंकार हत्तीला पाहण्यासाठी लहान थोर माणसांची मोठी गर्दी होत आहे. रविवारी सुट्टीचा दिवस, व सोमवारी बघ्यांची संख्या अधिक होती. काही लोक तर ओंकारला नमस्कार करण्यासाठीही उतावीळ झाले आहेत. इन्सुली गावातील भरवस्तीत हत्ती घुसल्याने ग्रामस्थांमध्ये काही काळ गोंधळ उडाला आणि अनेकांनी घराबाहेर जाणे टाळले.
पकड मोहीम कधी?
वन पथक स्थानिकांच्या सहकार्याने हत्तीला वस्तीपासून सुरक्षित अंतरावर नेण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अवकाळी पावसातही तळ ठोकून आहेत. त्यांच्या धाडसी प्रयत्नाचे कौतुक होत आहे. ओंकारला पकडण्याचा निर्णय सरकारने घेतला असतानाही, वन विभाग नेमकी कोणाची वाट पाहत आहे, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
उपवनसंरक्षक मिलीश शर्मा यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी महत्त्वाची बैठक सुरू असल्याचे सांगून भ्रमणध्वनीवर संवाद साधण्याचे टाळले.
