सावंतवाडी: सावंतवाडी तालुक्यातील मळेवाडजवळील घोडेमुख येथील रस्त्यावर गव्याच्या जोरदार धडकेत प्राथमिक शिक्षिका सृष्टी रविराज पेडणेकर (४८) जखमी झाल्या आहेत. ही घटना आज सकाळी पावणे सातच्या सुमारास घडली.
सृष्टी पेडणेकर या आपल्या दुचाकीवरून सावंतवाडीहून आजगावच्या दिशेने आजगाव प्राथमिक शाळेत जात असताना अचानक गव्याने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात त्या जखमी झाल्या. घटनेनंतर तात्काळ तेथील ग्रामस्थांच्या मदतीने आणि त्याच मार्गावरून जाणाऱ्या आरोस हायस्कूलचे मुख्याध्यापक शिरीष नाईक यांनी त्यांना आपल्या गाडीतून मळेवाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. या वेळी त्यांचे सहकारी शिक्षकही उपस्थित होते.
प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. अदिती ठाकर यांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले आणि पुढील उपचारांसाठी त्यांना सावंतवाडी येथे पाठवण्यात आले. शिक्षिका दत्तगुरु कांबळी आणि सौ. रुपाली कोरगावकर यांनी त्यांना सावंतवाडीला नेण्यासाठी मदत केली. सावंतवाडी मध्ये प्राथमिक उपचारानंतर तीला बेळगाव येथे अधिक उपचारासाठी हलविण्यात आले.
दरम्यान, या भागात गव्यांचा वावर वाढल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे स्थानिक ग्रामस्थ, वाहनधारक आणि शेतकरी त्रस्त झाले आहेत. जवळच वन विभागाची चौकी असूनही याबाबत कोणतीही ठोस पावले उचलली जात नसल्याने स्थानिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.