आजची तरुण पिढी समाज माध्यम व व्यसनांमध्ये गुरफटली असल्याबाबत नेहमी चिंता व्यक्त होते. या दुष्टचक्रातून सुटलेले काही तरुण पैशांच्या मागे धावत असल्याचे चित्रही कमी-अधिक प्रमाणात सर्वदूर दिसून येते. मात्र त्यास अपवाद ठरले, जळगाव जिल्ह्य़ातील धरणगाव तालुक्यातील कल्याणेहोळ हे गाव. या गावातील उच्चशिक्षित तरुणांनी आपल्या गावाला देशातील पहिले विज्ञानगाव बनविण्याचा आगळावेगळा प्रकल्प हाती घेतला आहे. त्याकरिता वेगवेगळ्या संकल्पनांद्वारे शालेय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाचा जागर सुरू आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यात वाचनसंस्कृती रुजावी म्हणून राज्य सरकारने सातारा जिल्ह्य़ातील भिलार येथे पुस्तकांचे गाव उभारण्यासाठी पुढाकार घेतला. हा प्रकल्प आकारास येण्याआधीपासून कल्याणेहोळ गावातील तरुणाई विज्ञानाचे गाव बनविण्यासाठी धडपड करीत आहे. नोबेल फाऊंडेशन व कल्याणेहोळ ग्रामपंचायत यांच्यावतीने माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम जयंतीनिमित्त विज्ञानगाव प्रकल्पांतर्गत गावात बालविज्ञान संस्कार केंद्र सुरू करण्यात आले. या अंतर्गत दर सोमवारी पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांसाठी विज्ञानविषयक सादरीकरण, वैज्ञानिक चित्रपट, व्याख्याने, स्पर्धाचे आयोजन करण्यात येत आहे. यामुळे ग्रामीण भागातील मुलांचा वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्यास मदत होईल. शेतकऱ्यांसाठी कृषी विज्ञान केंद्र सुरू करण्यात येत असून पंधरा दिवसातून एकदा पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना एकत्रित करीत आधुनिक शेती आणि पीक पद्धतींबाबत तज्ज्ञांद्वारे मार्गदर्शन केले जाणार आहे. ग्रामीण भागातील महिलांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर आहे; त्यासाठी गावात महिला आरोग्य विज्ञान केंद्र सुरू करण्यात आले आहे. या अंतर्गत दर महिन्याला गावात स्त्रीरोगतज्ज्ञ समुपदेशन, तपासणी व मार्गदर्शन करणार आहेत. अशाप्रकारे ग्रामीण भागात विज्ञानविषयक प्रकल्प राबविणारे कल्याणेहोळ हे राज्यातील पहिले गाव आहे. विद्यार्थी व पालकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा यासाठी प्रत्येक घरात भारतीय वैज्ञानिकांचे छायाचित्र लावण्यात येत आहे. तसेच गावातील ८० विजेच्या खांबांवर शास्त्रज्ञांची माहिती लावण्यात आली आहे. गावातील १५० झाडांना वैज्ञानिकांचे नाव देऊन तसे फलकही लावण्यात आले आहेत. बालविज्ञान संस्कार केंद्रासाठी ग्रामपंचायतीने सभागृह उपलब्ध करून दिले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Science village village of books
First published on: 24-10-2017 at 02:05 IST