माजलगावमधील भाजपचे पदाधिकारी बाबासाहेब आगे यांच्या भरदिवसा झालेल्या हत्येची घटना (१५ एप्रिल) ताजी असतानाच रविवारी सायंकाळी मद्यपींमधील वाद सोडवण्यासाठी गेलेल्या एका ढाबामालकाचा डोक्यात लाकूड घालून खून केल्याची घटना घडली. या घटनेत ढाबामालकाचा मुलगा व स्वयंपाकीही जखमी झाला. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महादेव गायकवाड (वय ४८, रा. मनूर) असे खून झालेल्या ढाबा मालकाचे नाव आहे. महादेव गायकवाड यांचा मुलगा आशुतोष यांच्या फिर्यादीवरून रोहित शिवाजीराव थावरे व इतर चार जणांविरुद्ध (रा. आनंदगाव) खुनाचा गुन्हा दाखल आहे.

तक्रारीनुसार माजलगाव शहरापासून जवळच राष्ट्रीय महामार्ग-६१ असून, पाथरी रोडवर नागडगाव फाटा येथे महादेव गायकवाड यांचे ‘गावरान ढाबा’ नावाचे हॉटेल आहे. या हॉटेलवर रविवारी संध्याकाळी पाच व्यक्ती मद्यपान करत बसले होते. काही कारणावरून त्यांच्यामध्ये वाद निर्माण झाला. त्यातून धाब्यावरील वस्तूंची मोडतोड करण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इतर ग्राहकांना याचा त्रास होऊ लागला. त्यामुळे ढाबामालक महादेव गायकवाड मध्यस्थीसाठी सरसावले. महादेव गायकवाड यांचा मुलगा आशुतोष व स्वयंपाकी बुढन हेही भांडण सोडवण्यासाठी पुढे आले. पण त्यांनाही मारहाण केली. या वेळी एका व्यक्तीकडून महादेव गायकवाड यांच्यावर हल्ला करण्यात आला. यात महादेव गायकवाड गंभीर जखमी झाले. त्यांना सुरुवातीला माजलगावमधील खासगी दवाखान्यात, नंतर बीडला हलवण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने छत्रपती संभाजीनगरकडे नेत असताना वाटेतच महादेव गायकवाड यांचा मृत्यू झाला.