हिंगोली : वसमत येथील बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच राज्यात या केंद्राने हळदीचे पैदासकार बियाणे हिंगोलीत शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिले आहे. विशेष म्हणजे, राज्य शासनाच्या बीज प्रमाणीकरण यंत्रणेकडे त्याची नोंद करण्यात आली. शासन दरबारी दुर्लक्षित असलेल्या हळद पिकाला भौगोलिक मानांकन मिळून ओळख मिळाली आहे, अशी माहिती हळद संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांच्या ऑनलाइन बैठकीत दिली.

हळद संशोधन केंद्राची स्थापना, उभारणी, सामान्य करार, जागतिक परिषदेचे आयोजन, बाजारभावासाठी केलेले प्रयत्न, भौगोलिक मानांकनातून वसमत हळदीची जगभर होत असलेली आणि नवनवीन वाणांची उपलब्धता याविषयी शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी उच्चस्तरीय अधिकारी व शास्त्रज्ञांची ऑनलाइन बैठक दोन दिवसांपूर्वी पार पडली. संशोधन केंद्राचे अध्यक्ष हेमंत पाटील यांच्या संकल्पनेतून झालेल्या या बैठकीत संशोधन केंद्राचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र कदम, महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक कुलकर्णी व शास्त्रज्ञांनी मार्गदर्शन केले.
मराठवाडा आणि विदर्भातील शेतजमिनीला अनुकूल अशा हळद पिकाच्या रोपांची निर्मिती व नवीन वाण लागवडीचा प्रयोग करण्यासंदर्भात बैठकीमध्ये मार्गदर्शन करण्यात आले. आगामी काळात शेतकऱ्यांना हळदीचे शुद्ध व दर्जेदार बियाणे प्रमाणीकरण करून उपलब्ध व्हावे यासाठी संशोधन केंद्र प्रयत्न करत आहे, असे पाटील यांनी बैठकीमध्ये सांगितले.

या वेळी बीज प्रमाणीकरण यंत्रणेचे शास्त्रज्ञ मनोज माळी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र कदम, जिल्हा बीज प्रमाणीकरण अधिकारी कदम, तंत्र अधिकारी रमेश देशमुख यांच्यासह संबंधित सर्वजण उपस्थित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शेतातच बीजोत्पादन

या वर्षी हळदीचे प्रमाणीकरण करण्याबाबत सर्व स्तरांवर नियोजन करून बेणेवाटप केले जात आहे. परंतु, आगामी काळात हळद पिकाचा बीजोत्पादन कार्यक्रम संशोधन केंद्र, तसेच प्रगतिशील शेतकऱ्यांच्या शेतावर राबवून हळदउत्पादकांना दर्जेदार, प्रमाणित बियाणे पुरवठा करण्याचा मानस आहे. त्यामुळे दर वर्षीच्या तुलनेत हळदीचे लागवड क्षेत्र वाढण्यास मदत होईल. हेमंत पाटील, अध्यक्ष, हळद संशोधन केंद्र