प्रदेश महिला कॉंग्रेसच्या ‘युवती-विद्यार्थिनी काँग्रेस’ (युविकाँ) शाखेतर्फे राज्यातील युवतींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यात येणार असून काँग्रेसच्या देशपातळीवरील पक्ष संघटनेत महाराष्ट्र हे अशी शाखा असणारे छत्तीसगढपाठोपाठ दुसरे राज्य ठरले आहे.

प्रदेश महिला कांग्रेसच्या अध्यक्षा चारुलता टोकस यांच्या संयोजनात ही शाखा सुरू करण्यात आली आहे. १८ ते ३५ या वयोगटातील युवतींना या शाखेचे सदस्य करण्यात येत आहे. त्यासाठी महाविद्यालये, नोकरदार महिला, समाजमाध्यमांद्वारे संपर्क साधणे सुरू आहे. या माध्यमातून युवतींचे विविध गट तयार करून कांग्रेस विचारसरणी, महिला व विद्यार्थिनींसाठी कॉंग्रेसच्या योजना, प्रसारमाध्यमांवर उपस्थिती, ब्लॉग लिहिणे याविषयी मार्गदर्शन केले जाईल, तसेच समुपदेशन केंद्र, रोजगार शिबिरे, पथनाटय़े, आरोग्य शिबिरे, विधिसल्ला व अन्य उपक्रम प्रस्तावित आहेत.

नोंदणीबाबत दक्षता ठेवली जाईल. सदस्य युवतींची संपूर्ण माहिती अधिकृत असावी, यासाठी कटाक्ष ठेवू. ‘मिस कॉल’ सदस्य राहणार नाहीत, असा टोला टोकस यांनी भाजप सदस्य नोंदणीच्या पाश्र्वभूमीवर मारला. यापूर्वी छत्तीसगढची प्रभारी असताना युविका शाखा त्या राज्यात सुरू केली होत्या.

युविका शाखेतर्फे  प्रत्येक जिल्ह्य़ात ज्युदो-कराटेचे प्रशिक्षण केंद्र स्थापन केले जाणार आहे. तज्ज्ञ प्रशिक्षकांद्वारे युवतींना स्वसंरक्षणाचे धडे दिले जातील. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचीही मदत यासाठी घेतली जाणार आहे. वैद्यकीय मदत, विधिविषयक सल्ला देण्यावर भर राहील. शिल्पा जवादे (नागपूर), रुपाली कापसे (नवी मुंबई), शलाका नाईक (ठाणे), डॉ.सुनिता ढामणे (नाशिक), स्मिता खानापुरे (लातूर), विभा राऊत (अकोला) यांच्या नियुक्त्या झाल्या आहेत.  राष्ट्रवादीच्या युवती कांग्रेसला प्रत्युत्तर म्हणून युविका शाखा स्थापन करण्यात आल्याचे टोकस यांनी नाकारले.