वसंत मुंडे

बीड: घरकाम करणाऱ्या बाईने गावात पाणी नसल्याने ‘मुलांना कोणी मुलीही देत नाही’, अशा शब्दात पाणी टंचाईची भीषणता सांगितल्यानंतर सेवानिवृत्त कर्नल शशिकांत दळवी यांनी दोन वर्षापूर्वी बीड तालुक्यतील कामखेडा या गावात येऊन घरावरच्या छतावरचे पाणी जमिनीत जिरवण्यासाठी तीस घरावर पुनर्भरण यंत्रणा बसवली आणि वर्षभरातच गाव टंचाईमुक्त झाले. आता जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांच्या पुढाकारातून हा उपक्रम दहा तालुक्यातील शंभर गावात राबवण्यास सुरुवात झाली असून गावांची जल आत्मनिर्भरतेची चळवळ टँकर मुक्तीच्या दिशेने टाकलेले पाऊल ठरणार आहे.

Amul dominates the Mumbai milk market
मुंबईच्या दूध बाजारपेठेवर ‘अमूल’चे वर्चस्व
onine
नाशिकमध्ये पर्यायी कांदा बाजार सुरू; तरीही शेतकऱ्यांची लूट ?
thane traffic
कल्याण: पत्रीपुलावर दोन तासांपासून वाहनांच्या रांगा
Mata Mahakali Yatra in Chandrapur to Commence on 14 April
१४ एप्रिलपासून माता महाकालीच्या यात्रेला सुरूवात; एक महिना चालणार यात्रा, तयारी पूर्ण

बीड जिल्ह्याला दरवर्षी पाणी टंचाईमुळे टँकरच्या मागे धावावे लागते. एक हजारापेक्षा अधिक टँकरच्या पाण्यावरच नागरिकांची तहान अवलंबून असते. सरकारच्या अनेक योजनांवर लाखो रुपयांचा खर्च झाला तरी टँकरच्या पाण्यापासून सुटका झाली नाही. परिणामी पाण्याअभावी अनेकांना रोजगारासाठी मोठ्या शहरात स्थलांतरित व्हावे लागते. पुणे येथे कामखेड्यातून स्थलांतरित झालेल्या जयश्री वाघमारे या सेवानिवृत्त कर्नल शशिकांत दळवी यांच्याकडे घरकाम करतात. गावाकडे पाणी नसल्याने ‘मुलांना लोक मुलीही देत नाहीत’, हंडाभर पाण्यासाठी दिवसभर टँकरची वाट बघावी लागते. अशा शब्दात गावाकडच्या पाण्याची भीषणता सांगितली आणि कर्नल दळवी यांनी दोन वर्षापूर्वी थेट कामखेडा गावात येऊन गावकऱ्यांना एकत्रित केले. छतावरील पाण्याचे पुनर्भरण करण्यास प्रोत्साहित केले आणि तीस घरावर पुनर्भरण यंत्रणा बसवली. गाव पहिल्याच वर्षी टँकरमुक्त झाले. पाण्याची पातळीही वाढल्याने हा प्रकल्प आता टंचाईग्रस्त गावांसाठी दिशादर्शक ठरला. कर्नल दळवी यांच्या पुढाकारातून आणि जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांच्या सहकार्यातून आता जिल्ह्यात आत्मनिर्भरतेची जलसंचय चळवळच सुरू करण्यात आली आहे. तालुक्यातील शंभर गावातील साडेचार हजार घरांच्या छतावर जल पुनर्भरण यंत्रणा बसवण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात पाच तालुक्यातील चौदा गावात ३७३ घरावर यंत्रणा बसवण्याचे काम सुरू झाले आहे.

कोयाळ (ता.आष्टी) सह चार गावात काम पूर्ण झाले असुन १६२ घरांवर ही यंत्रणा बसवण्यात आली आहे. पावसाचे पडणारे पाणी गावातच जिरवण्याचे आणि त्यातून पाणी पातळी वाढवण्याचा हा प्रयोग टँकर मुक्तीसाठी महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. जल पुनर्भरणाबरोबरच गावात अडीच हजार झाडे देण्यात येणार असून गावकऱ्यांच्या मागणीनुसार ही झाडे देऊन त्यांचे संवर्धन करण्याची जबाबदारी गावकऱ्यांवर राहणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जैवविविधता वाढण्यास मदत होणार आहे. कर्नल दळवी यांच्या या जलपुनर्भरण चळवळीला आयसीआयसीआय बँक फाउंडेशन मदत करत आहे. नुकतेच बँकेचे वरिष्ठ अधिकारी जोखीम कोलाको, लेखापरीक्षक शैलेश झा यांनी मुंबईतून कामखेडा येथे येऊन या उपक्रमाची माहिती घेतली. कर्नल दळवी यांच्याबरोबर अनिल तोडकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी शंभर गावात जनजागृती आणि जलपुनर्भरण करण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. तीन महिन्यात हा प्रकल्प पूर्ण करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने कामाचे नियंत्रण आणि पाठपुराव्यासाठी गावचे सरपंच, ग्रामसेवक, शिक्षक, अंगणवाडी शिक्षिका यांच्यावर जबाबदारी देण्यात आली, अशी माहिती प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी दिली.

सात राज्यात काम-कर्नल शशिकांत दळवी

कर्नल शशिकांत दळवी पुण्यात राहत असलेल्या सोसायटीत दरवर्षी पाण्यावर तीन लाख रुपयांचा खर्च करावा लागत होता. ही गोष्ट लक्षात घेऊन दळवी यांनी लष्करात असताना राजस्थानमध्ये राबवले जाणारे पुनर्भरण सोसायटीत राबवण्याचा निर्णय घेतला आणि २००३ मध्ये सोसायटी टँकरमुक्त केली. इतर सहकाऱ्यांच्या माध्यमातून त्यांनी जलपुनर्भरण चळवळ गतिमान केली. सात राज्यांमध्ये या जलपुनर्भरण चळवळीचे काम चालू आहे. घरी काम करणाऱ्या बाईने गावाकडची पाणी टंचाईची भीषणता सांगितल्यानंतर कामखेडा येथे पुनर्भरणाचा प्रयोग यशस्वी केला. आता जिल्हा परिषद प्रशासनाच्या सहकार्यातून शंभर गावात हा प्रयोग केला जात असल्याचे दळवी यांनी सांगितले.