शिवसेनेचे मुखेड तालुकाप्रमुख शंकर पाटील ठाणेकर यांची नगर जिल्ह्य़ातील जामखेडजवळ दरोडेखोरांनी भररस्त्यात हत्या केली. या प्रकाराची मुखेड तालुक्यात संतप्त प्रतिक्रिया उमटली. मुखेड शहरात बुधवारी कडकडीत ‘बंद’ पाळण्यात आला.
दोन-तीन दिवसांपूर्वी पक्षनेत्यांच्या भेटीसाठी मुंबईला गेलेले ठाणेकर मंगळवारी पुणे, नगरमार्गे गावी परतत होते. इनोव्हा गाडीत (एमएम ६ एएस ७८७३) त्यांच्यासोबत शिवसेनेचे मनोज गौंड, शिवाजी गेडेवार, शंकर पाटील लुट्टे व भालचंद्र नाईक हे कार्यकर्ते होते. मध्यरात्रीनंतर एकच्या सुमारास पाठीमागून आलेल्या वाहनातील आरोपींनी रस्त्यात मधोमध त्यांची गाडी थांबवून इनोव्हा गाडीत असलेल्या शिवसैनिकांना रिव्हॉल्व्हर व तीक्ष्ण हत्याराचा धाक दाखवून ऐवज लुटला. स्वत: वाहन चालविणाऱ्या शंकर पाटील यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला; पण तीक्ष्ण हत्याराचा (चॉपर) वार झाल्याने ते जागीच मरण पावले. इतर चौघांपैकी दोघे जखमी झाले, तर दोघे बचावले.
या प्रकारानंतर आरोपींनी इनोव्हा गाडी पळवून नेली; पण सकाळी ती नगर जिल्ह्य़ातीलच कर्जत येथे रस्त्यावर सापडली. या घटनेमागे राजकीय वैमनस्य नाही. हा ‘रोड रॉबरी’चा प्रकार असावा, असे तेथील पोलिसांना वाटते. मात्र, यात धडाडीच्या शिवसैनिकाचा बळी गेल्याने मुखेडचे माजी आमदार सुभाष साबणे, जिल्हाप्रमुख हेमंत पाटील, नव्यानेच शिवसेनेत गेलेले प्रताप पाटील चिखलीकर, प्रा. मनोहर धांडे आदींना धक्का बसला. या घटनेतील हल्लेखोरांना अटक झाली पाहिजे, या मागणीसाठी शिवसैनिकांनी मुखेड पोलीस ठाण्यात गर्दी करून ठिय्या दिला. दुसरीकडे शहरात कडकडीत ‘बंद’ पाळण्यात आला.
ठाणेकर हे जाहूर (तालुका मुखेड) येथील रहिवासी. १९९० च्या दशकात गावचे उपसरपंचपद भूषवून तालुक्याच्या राजकारणात आले. १९९९ मध्ये सेनेकडून सुभाष साबणे आमदार झाल्यानंतर ठाणेकर पक्षसंघटनेत पुढे आले. त्यांच्यावर तालुका प्रमुखपदाची जबाबदारी आली. तालुक्यातील अनेक गावात मनरेगा योजनेत गैरव्यवहार झाले. ते ठाणेकर यांनी चव्हाटय़ावर आणले. अनेक प्रकरणात त्यांनी सत्ताधारी, तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांना अडकवून खळबळ माजवली. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुली व मुलगा असा परिवार आहे.
दरम्यान, साबणे कार्यकर्त्यांसह जामखेडला गेले. दुपारनंतर मृतदेह घेऊन तेथून निघाले. सायंकाळनंतर जाहूर येथे अंत्यसंस्कार झाले. सेनेचे संपर्कनेते खासदार विनायक राऊत, संपर्कप्रमुख बबन थोरात हेही दाखल झाले. प्रताप पाटील चिखलीकर, प्रकाश कौडगे, हेमंत पाटील आदींसह शिवसैनिक, विविध पक्षांचे कार्यकर्ते अंत्यसंस्कारास उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sena mukhed taluka chairman shanker thanekar murder
First published on: 04-09-2014 at 01:58 IST