ज्येष्ठ नाट्य समीक्षक, विचारवंत आणि प्रभावी वक्त्या प्रा. पुष्पा भावे यांचं आज (शनिवारी) मध्यरात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास दीर्घ आजाराने मुंबईत निधन झालं, त्या ८१ वर्षांच्या होत्या. शिवाजीपार्क स्माशानभूमीत त्यांच्यावर अंत्यंस्कार करण्यात येणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्र सेवा दलाचे संस्कार आणि पुरोगामी विचारवंत असलेल्या पुष्पा भावे या मुंबईच्या रुईया महाविद्यालयातून प्राध्यापिका म्हणून निवृत्त झाल्या होत्या. नाट्य समीक्षक आणि परखड विचारसरणी असलेल्या भावे यांनी संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, दलित पँथर, देवदासी मुक्ती अशा चळवळींमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला होता. प्रा. पुष्पा भावे यांच्या निधनामुळे खंबीर स्त्रीवादी कार्यकर्त्या आणि शोषितांचा आवाज शांत झाल्याची भावाना व्यक्त होत आहे.

कोण होत्या प्रा. पुष्पा भावे?

सुस्पष्ट वैचारिक भूमिका, लोकशाही आणि समतेच्या मूल्यांचा वसा, प्रभावी वक्तृत्व आणि त्याला सुसंगत प्रत्यक्ष कृतीची जोड ही ज्येष्ठ समाजवादी नेत्या, विचारवंत आणि लेखिका प्रा. पुष्पा भावे यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्टय़े होती. विद्यार्थिदशेपासून राष्ट्र सेवा दल आणि लोकशाहीवादी चळवळींशी पुष्पाताईंचा संपर्क होता. रूढार्थाने मराठीच्या प्राध्यापक आणि विद्यार्थिप्रिय शिक्षक या नात्याने अध्यापन क्षेत्रात कार्यरत असताना केवळ हस्तिदंती मनोऱ्यात राहण्याऐवजी क्रियाशील स्वभावामुळे त्या सातत्याने समाजाशी जोडल्या गेल्या.

संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, गोवामुक्ती आंदोलन अशा सत्याग्रहांमध्ये भाग घेत त्यांनी ही नाळ यशस्वीपणे सांभाळली. म्हणूनच स्वातंत्र्योत्तर काळात महागाईविरोधी आंदोलनामध्ये अहिल्याताई रांगणेकर आणि मृणाल गोरे यांच्यासमवेत पुष्पाताई या लाटणे मोर्चात हिरिरीने सहभागी झाल्या होत्या. मुंबईतील गिरणी कामगार संघर्ष समितीच्या चळवळीला वैचारिक मार्गदर्शन करण्यापासून कामगारांना हक्काचे घर मिळावे यासाठी सरकारशी संघर्ष करण्यात पुष्पाताई अग्रभागी होत्या. स्त्रीवादी चळवळीची पाठराखण करणाऱ्या पुष्पाताईंनी दलित स्त्रियांच्या संघटनेमध्ये स्वतंत्र वैचारिक भूमिका घेत संघटन केले होते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये त्या आरंभापासून होत्या. डॉ. बाबा आढाव यांच्या असंघटित कामगार चळवळीत हमाल, रिक्षावाले, कागद-काच-पत्रा वेचणारे अशा कष्टकऱ्यांच्या आंदोलनांमध्ये त्या समर्थक राहिल्या. सामाजिक कृतज्ञता निधी या सामाजिक कार्यकर्त्यांना मानधन देणाऱ्या उपक्रमामध्ये पुष्पाताई सतत अग्रभागी होत्या.

मराठवाडा विद्यापीठ नामांतर, मंडल आयोग अशा प्रश्नांवर झालेल्या चळवळींवर पुष्पाताईंचा वैचारिक ठसा होता. आणीबाणीविरोधात लोकनेते जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली उभ्या राहिलेल्या संपूर्ण क्रांती आंदोलनातून जन्माला आलेल्या जनता पक्षाचे पुष्पाताईंनी तडफेने काम केले. मराठी भाषा आणि मराठी नाटक हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. अनेक गाजलेल्या नाटकांची त्यांनी केलेली समीक्षणेही गाजली आहेत. विजय तेंडुलकर, महेश एलकुंचवार, विजया मेहता, सतीश आळेकर या दिग्गजांना पुष्पाताई काय म्हणतात याविषयी उत्सुकता असे. रुईया महाविद्यालयातील अध्यापन क्षेत्रातून निवृत्त झाल्या तरी पुष्पाताई सामाजिक कार्यातून थांबल्या नाहीत, तर उलट सामाजिक चळवळींसाठी अधिकाधिक वेळ देता येईल याचा आनंद त्यांना होता.

२०१३ मध्ये मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठास दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यास त्यांनी विरोध केला होता, तो ठाकरे यांनी साहित्यिकांचा अपमान केला होता म्हणून. साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक निधी, अनुवाद सुविधा केंद्र, भारत-पाकिस्तान पीपल्स फोरम फॉर पीस अ‍ॅण्ड डेमॉक्रसी, मृणाल गोरे साऊथ एशियन सेंटर, केशव गोरे स्मारक ट्रस्ट, मानवी हक्कांसाठी काम करणारी मेहेर संस्था अशा विविध संस्था-संघटनांमध्ये पुष्पाताई पदाधिकारी होत्या. ‘गुड मुस्लीम, बॅड मुस्लीम’ या महमूद ममदानी यांच्या गाजलेल्या इंग्रजी पुस्तकाचा पुष्पाताईंनी मराठी अनुवाद केला आहे. गेल्या अर्धशतकाहून अधिक काळ सामाजिक प्रश्न आणि चळवळी यांच्याशी केवळ जोडल्याच गेलेल्या नव्हे तर आधारस्तंभ राहिलेल्या पुष्पाताईंना समाजकार्याबद्दल महाराष्ट्र फाऊंडेशनतर्फे जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Senior drama critic social activist professor pushpa bhave passed away aau
First published on: 03-10-2020 at 09:20 IST