ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि ‘शिवचरित्र’कार गजानन भास्कर मेहेंदळे (वय ७८) यांचे बुधवारी सायंकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने खासगी रुग्णालयात निधन झाले. ते अविवाहित होते. भारत इतिहास संशोधक मंडळ येथे गुरुवारी (१८ सप्टेंबर) सकाळी अकरा वाजता मेहेंदळे यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी एक वाजता त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
शालेय जीवनापासूनच गजानन मेहेंदळेंना होती इतिहास विषयाची गोडी
गजानन मेहेंदळे यांचा जन्म १९ डिसेंबर १९४७ चा. गजानन मेहेंदळे यांना शालेय जीवनापासूनच इतिहास हा विषय आवडत होता. त्यांनी १९६९ मध्ये पुण्याच्या भारत इतिहास संशोधक मंडळात पाऊल ठेवलं आणि अभ्यास करण्यास सुरुवात केली. यामुळेच त्यांना युद्धशास्त्र या विषयाची गोडी लागली. वयाच्या १८ व्या वर्षापासून त्यांनी युद्धशास्त्राचं वाचन आणि अभ्यास असं दोन्ही सुरु केलं होतं.
२४ व्या वर्षी युद्ध बांगलादेशात जाऊन अनुभवली युद्धजन्य परिस्थिती
गजानन मेहेंदळे यांनी वयाच्या २४ व्या वर्षी पत्रकार म्हणून बांगलादेश येथे जाऊन तेथील युद्धजन्य परिस्थितीचा अभ्यास केला. युद्ध सुरु होण्याच्या सात महिने आधी ते तिथे होते. त्यामुळे त्यांना जवळून आणि बारकाईने हा अभ्यास करता आला. तिथे त्यांनी तरुण भारत या दैनिकासाठी विविध मुलाखतीही घेतल्या. भारत आणि बांगलादेश यांच्यात युद्ध सुरु झाल्यानंतरही गजानन मेहेंदळे हे बांगलादेशात होते. तेथील अनेक भारतीय लष्करी अधिकाऱ्यांच्या मुलाखती त्यांनी घेतल्या.
युद्धशास्त्राचा बारकाईने केला अभ्यास
युद्धविराम झाल्यानंतर गजानन मेहेंदळे भारतात आले. बांगलादेश युद्धावर त्यांनी एक पुस्तकही लिहिलं. त्यानंतर गजानन मेहेंदळेंनी पुणे विद्यापीठातून एम. ए. ही पदवी सामरिकशास्त्र या विषयात घेतली. त्यावेळी युद्धतंत्राचा अभ्यास करताना ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धशास्त्राकडे आणि कौशल्यांकडे वळले. तसंच त्यांनी शिवाजी महाराजांच्या चरित्राचाही अभ्यास केला. त्यासाठी गजानन मेहेंदळे मोडी लिपी शिकले. तसंच फारसी, उर्दू, जर्मन, फ्रेंच आणि पोर्तुगीज या भाषाही गजानन मेहेंदळे शिकले. छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यास करण्यासाठी ते भारतभर फिरले होते. त्यानंतर त्यांनी शिवचरित्र इंग्रजीतून लिहिलं. इतकंच नाही तर मराठीतूनही विपुल लेखन केलं. १६५८ पर्यंतच्या इतिहासावर त्यांनी १६५० हून अधिक पानं लिहिली आहेत.
गजानन मेहेंदळे यांनी लिहिलेली पुस्तकं
शिवाजी हिज लाइफ अँड टाइम्स
शिवछत्रपतींचे आरमार
आदिलशाही फर्माने
टिपू अॅज ही रिअली वॉज
मराठ्यांचे आरमार
शिवचऱित्र खंड १ आणि २
शिवाजी झाला नसता तर
ही त्यांची पुस्तकं आहेत. तसंच शिवचरित्र या विषयावर ते व्याख्यानही देत असत. शिवाजी महाराजांना इतिहासातून काढलं तर आपला इतिहास कुठे जातो? आणि इतिहासात त्यांचा समावेश केला तर इतिहास कुठे जातो ? हे अभ्यासणं महत्त्वाचं आहे. इस्लामी राजवटींना छत्रपती शिवरायांनी रोखलं होतं हे जर कळलं तरच आपल्याला शिवचरित्र कळलं असं म्हणता येईल असंही मेहेंदळेंनी म्हटलं होतं. गजानन मेहेंदळेंनी २००० ते २०१७ अशी १७ वर्षे पहिले आणि दुसरे महायुद्ध या दोन्हींचा सखोल अभ्यास करून त्यावर सुमारे सहा हजार पानांचे लेखन पूर्ण केलं. त्यातही गुप्त संदेश उलगडणे आणि त्यांचे वाचन करणे या विषयावर त्यांनी एक पुस्तक लिहिले आहे.