Ujjwal Nikam : जेष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपती नामनिर्देशित सदस्य म्हणून राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती कोट्यातून ही नियुक्ती करण्यात आली आहे. उज्ज्वल निकम यांच्यासह माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला, शिक्षणतज्ज्ञ सी सदानंदन मास्ते आणि शिक्षणतज्ज्ञ मीनाक्षी जैन यांची देखील राष्ट्रपती नामनिर्देशित सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. दरम्यान, या नियुक्तीनंतर वकील उज्ज्वल निकम यांनी माध्यमांशी संवाद साधत या नियुक्तीबाबत प्रतिक्रिया देत आभार व्यक्त केले आहेत. तसेच आता राष्ट्रपती नियुक्त सदस्य असल्यामुळे माझ्यावर ही मोठी जबाबदारी असणार आहे, असं उज्ज्वल निकम यांनी म्हटलं आहे.

वकील उज्ज्वल निकम काय म्हणाले?

“आपलं दोन्ही भाषेवर प्रभुत्व आहे. तुम्ही कोणत्याही भाषेत माझ्याशी संवाद साधू शकता, तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्याशी मराठीत संभाषण केलं आणि मला सांगितलं की राष्ट्रपती तुमच्यावर एक जबाबदारी सोपवू इच्छित आहेत. ही जबाबदारी देशाच्या दृष्टीकोनातून तुम्ही चांगली सांभाळाल अशा मी तुम्हाला शुभेच्छा देतो. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मी आभार मानतो”, असं उज्ज्वल निकम यांनी म्हटलं आहे.

“भाजपाने मला जेव्हा लोकसभेची उमेदवारी दिली होती, तेव्हा पक्षाचे अध्यक्ष जे पी नड्डा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाने माझ्यावर लोकसभेच्या निवडणुकीत जो विश्वास दाखवला होता तो विश्वास मी यावेळी सार्थ करून दाखवेन. अर्थात राष्ट्रपती नियुक्त सदस्य असल्यामुळे माझ्यावर मोठी जबाबदारी असणार आहे. कायद्याचा अभ्यास आणि कायद्याचं विश्लेषण आणि या देशाच्या ऐक्यासाठी, देशातील लोकशाही आणि देशाचं संविधान कशा पद्धतीने प्रबळ राहील याची काळजी घेण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन”, असं उज्ज्वल निकम म्हणाले आहेत.

“महाराष्ट्राच्या जनतेला मी आश्वासित करतो, कारण महाराष्ट्रातून माझ्या एकट्याचीच नियुक्ती राष्ट्रपतींनी केली आहे. त्यामुळे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे मी आभार व्यक्त करतो. मला कल्पना आहे की माझ्यावरील ही जबाबदारी मोठी असली तरी सर्वांचे आशीर्वाद मला मिळतील. मी अनेक दहशतवाद्यांचे खटले चालवले. २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा कट पाकिस्तानात रचला असा कुठेही पुरावा नसल्याचं पाकिस्तानने सांगितलं होतं. पण त्यांना उत्तर देताना आम्ही डेव्हिड हेडलीची साक्ष घेतली होती. डेव्हिड हेडलीची साक्ष घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नामुळे आम्ही त्यावेळी डेव्हिड हेडलीची साक्ष घेऊ शकलो”, असंही उज्ज्वल निकम यांनी म्हटलं आहे.

उज्ज्वल निकम यांच्यासह तिघांची राज्यसभेवर नियुक्ती

उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे. उज्ज्वल निकम यांच्याबरोबरच भारताचे माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला, शिक्षणतज्ज्ञ सी सदानंदन मास्ते, शिक्षणतज्ज्ञ मीनाक्षी जैन यांचीही राष्ट्रपती नामनिर्देशित सदस्य म्हणून म्हणून राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या शुभेच्छा

“उज्ज्वल निकम यांची कायदेशीर क्षेत्राप्रती आणि आपल्या संविधानाप्रती असलेली निष्ठा अनुकरणीय आहे. ते केवळ एक यशस्वी वकील राहिले नाहीत तर महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये न्याय मिळवण्यातही ते आघाडीवर राहिले आहेत. त्यांच्या संपूर्ण कायदेशीर कारकिर्दीत, त्यांनी नेहमीच संवैधानिक मूल्ये बळकट करण्यासाठी आणि सामान्य नागरिकांना नेहमीच सन्मानाने वागवले जावे यासाठी काम केले आहे. भारताच्या राष्ट्रपतींनी त्यांना राज्यसभेवर नामांकित केले आहे हे आनंददायी आहे. त्यांच्या संसदीय कारकिर्दीसाठी माझ्या शुभेच्छा”, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उज्ज्वल निकम यांना शुभेच्छा दिल्या आहेत.