Eknath Khadse : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली आहे. पदाधिकाऱ्यांच्या या बैठकीत शरद पवार कोणत्या विषयावर चर्चा करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण त्याआधीच शरद पवारांच्या गटातील एक गट अजित पवारांच्या गटात जाण्यास इच्छूक असल्याची चर्चा आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांचाही समावेश असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे आगामी काळात तेही अजित पवारांच्या गटात जाण्याची शक्यता आहे. यावर त्यांनी आज भूमिका स्पष्ट केली. बैठकीआधी त्यांनी आज माध्यमांना मुलाखत दिली.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील एक गट अजित पवारांच्या गटात जाण्यास इच्छूक आहे, यामध्ये एकनाथ खडसेंचंही नाव घेतलं जातंय, असं आज पत्रकारांनी एकनाथ खडसेंना विचारलं. त्यावर ते म्हणाले, “अजित पवारांच्या गटात जळगावच्या जिल्ह्यातील काही मंडळी गेली. ज्यांना जायचं होतं ते गेले, ज्यांना राहायचं होतं ते राहिले. आता कोणी जाईल असं वाटत नाही.”
“शरद पवारांचा निर्णय तो आमचा निर्णय. जो निर्णय होईल, आम्ही सर्व कार्यकर्ते मान्य करू. पण आज तरी असा कोणताच विचार नाही. म्हणजेच अजित पवारांच्या गटात जाण्याची शक्यता नाही. अशा चर्चांना काही अर्थ नाही. जेव्हा अजित पवारांचा गट वेगळा झाला, तेव्हा महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार तिथे गेले. तेव्हा मलाही निरोप दिला होता. पण त्यावेळीही मी गेलो नाही. मी शरद पवारांबरोबरच राहिलो. आताही शरद पवारांबरोबर राहणार”, असंही एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलं.
आज बैठकीत काय होणार?
शरद पवार आणि अजित पवार गेल्या काही दिवसांपासून सातत्याने विविध कार्यक्रम आणि व्यासपीठांवर एकत्र दिसत आहेत. अनेक जिल्हास्तरीय बैठकांमध्येही काका-पुतणे मांडीला मांडी लावून बसलेले दिसले. तसंच, शरद पवारांनी कार्यकर्त्यांच्या मनातील भावनाही उघडपणे बोलून दाखवली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत हे विलग झालेले हे दोन्ही गट एकत्र येतील अन्य राज्याला नवं समीकरण पाहायला मिळेल का हे पाहावं लागणार आहे.