सावंतवाडी: सावंतवाडी-कणकवली मार्गावरील कोलगाव येथील जुन्या जकात नाक्याजवळ झालेल्या एका भीषण अपघातात रुपेश अनिल पाटकर (वय ३९, रा. माजगाव-कुंभारवाडा) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

रस्त्यावर उघड्या असलेल्या एका लोखंडी गेटला दुचाकीची धडक बसल्यानंतर तो रस्त्यावर पडला आणि मागून येणाऱ्या एसटी बसखाली सापडल्याने हा अपघात घडला. या प्रकरणी पोलिसांनी फॅब्रिकेशन वर्कशॉपचा मालक आणि एसटी चालकावर गुन्हा दाखल केला आहे.

ही घटना आज शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घडली. रुपेश पाटकर आपल्या दुचाकीवरून कुडाळ येथे परत जात असताना, कोलगाव आयटीआयपासून १०० मीटर अंतरावर असलेल्या ‘न्यु अंबिका फॅब्रिकेशन’ वर्कशॉपचा लोखंडी गेट उघडा आणि रस्त्यावर आलेला होता. अचानक समोर आलेल्या या गेटचा अंदाज न आल्याने रुपेशच्या दुचाकीची त्याला जोरदार धडक बसली.

या अपघाताला कारणीभूत ठरल्याबद्दल न्यु अंबिका फॅब्रिकेशनचे मालक रमेश गजानन केनवडेकर आणि एसटी बस चालक कृणाल हनुमंत सातार्डेकर (रा. मोरगाव, ता. दोडामार्ग) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी दिली आहे. मृत रुपेश पाटकर हा ‘व्ही गार्ड इलेक्ट्रॉनिक’ कंपनीची एजन्सी सांभाळत होता.