शिवसेनेच्या बंडखोर शिंदे गटातील मंत्री संदीपान भुमरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला आहे. उद्धव ठाकरेंनी शंकरराव गडाख या अपक्ष आमदाराकडून पैसे घेऊन जलसंधारण मंत्री आणि पालकमंत्री केलं, असा गंभीर आरोप भुमरेंनी केला. तसेच सत्ता तुमच्या बापाची आहे का? असा प्रश्न विचारला आहे. ते शुक्रवारी (३० सप्टेंबर) औरंगाबादमध्ये दसरा मेळाव्याच्या अनुषंगाने घेतलेल्या जिल्हा मेळाव्यात बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संदीपान भुमरे म्हणाले, “गोचिड जसे जनावरांचं रक्त पितात तसे हे टम झाले आहेत. सुभाष देसाई आम्ही मंत्री असून आमच्या कुणाशीही बोलत नव्हते. ते बैठकीत यायचे आणि हात जोडून निघून जायचे. आम्ही काही बोललो, तर मी चाललो बैठकीतून असं म्हणायचे. अरे तुमच्या बापाची सत्ता आहे का? आम्ही निवडून यायचं आणि सत्ता तुम्ही भोगायची.”

“मी दुसऱ्या जिल्ह्यात गेलो तर कुणी बुकेही घेऊन यायचं नाही”

“तुम्ही आम्हाला गद्दार म्हणता. आम्ही खस्ता खाल्ल्या आहेत. यांनी शंकरराव गडाख या अपक्ष आमदाराला जलसंधारण खातं दिलं. अपक्ष माणसाला पालकमंत्री केलं, पण यांना पालकमंत्री करायला संदीपान भुमरे दिसला नाही. त्यांना वाटलं नाही की भुमरेंना जलसंधारण द्यावं. मला असं खातं दिलं ज्याला आस्थापनाच नाही. एक अधिकारी नव्हता. मी कुठं दुसऱ्या जिल्ह्यात गेलो तर कुणी बुकेही घेऊन यायचं नाही,” असं संदीपान भुमरे यांनी सांगितलं.

व्हिडीओ पाहा :

हेही वाचा : “जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो…”, एकनाथ शिंदेंनंतर उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याचा टीझर

“तुम्ही शंकरराव गडाखांकडून किती खोके घेतले हे आम्हाला माहिती”

“शिवसैनिकाला हे असं खातं आणि गद्दाराला पालकमंत्री, जलसंधारण दिलं. व्वा रे मातोश्री आणि आम्हाला गद्दार म्हणता. खरे गद्दार तर तुम्ही आहात. शंकरराव गडाख यांच्यासोबत काय व्यवहार केला हे आम्हाला माहिती आहे. तुम्ही शंकरराव गडाखांकडून किती खोके घेतले हे आम्हाला माहिती आहे,” असं म्हणत संदीपान भुमरे यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Serious allegations of bribe by sandeepan bhumare on shivsena party chief uddhav thackeray rno news pbs
First published on: 30-09-2022 at 18:40 IST