विश्वास पवार, लोकसत्ता
वाई : साताऱ्यात ऊस गाळपाचा प्रश्न गंभीर झाला आहे. साताऱ्यातील संपूर्ण उसाचे गाळप झाल्याशिवाय कारखाने बंद करू नयेत अशा सूचना सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी साताऱ्यातील साखर कारखान्यांना दिल्या आहेत. साताऱ्यात यावेळी उसाचे उत्पादन वाढले आहे. गाळप हंगाम संपण्याच्या मार्गावर असतानाही सातारा जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणात ऊस गाळपाअभावी शेतात उभा आहे. यावेळी उसाचे उत्पन्न वाढल्यामुळे गाळपाचे साखर कारखान्यांकडे मोठे आव्हान आहे.
मागील दोन वर्षांत झालेला पाऊस आणि दुष्काळी भागात आलेल्या पाण्यामुळे शेतकऱ्यांनी मोठय़ा प्रमाणात उसाची लागवड केली. त्यामुळे सर्व साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात अतिरिक्त उत्पादनाबाबतचा प्रश्न निर्माण मागील वर्षांपासून गंभीर होतो आहे. कारण पट्टा पद्धत ड्रीपपद्धतीमुळे उत्पादन वाढले आहे. गळीत हंगाम सुरू झाल्यापासून शेतात उभ्या असलेल्या उसाचे गाळप करण्याचा मोठा प्रश्न साखर कारखान्यांपुढे आहे.संपूर्ण उसाचे गाळप झाले पाहिजे असे नियोजन आहे. यावर्षी हेक्टरी उत्पादनही वाढले आहे.
उत्तर साताऱ्यातील पाच तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेला किसन वीर, खंडाळा सहकारी आणि प्रतापगड हे कारखाने बंद आहेत. या कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील पंधरा लाख टन उसापैकी वाई कोरेगाव खंडाळा येथे दहा लाख टन ऊस गाळपाअभावी उभा आहे. साताऱ्यातील आजूबाजूच्या क्षेत्रातील साखर कारखान्यांना ऊस गाळपाच्या सूचना केल्या आहेत. तरीही साताऱ्यातील किसन वीरसह सर्व कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील उसाचे गाळप होत नाही तोपर्यंत कारखाने बंद करू नयेत अशा सूचना केल्या आहेत. साखर आयुक्तांकडून मी स्वत: आढावा घेत असल्याचे सहकार मंत्र्यांनी सांगितले आहे. साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्याशी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी चर्चा केली. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याशीही त्यांनी चर्चा केली. उसाच्या पट्टयात तोडीला आलेल्या टोळय़ा होळी झाली की परतीची वाट धरतात. यासाठी पहिल्यांदा टोळय़ा न सोडण्याची सूचना केली.
जिल्ह्यातील सर्व उसाचे गाळप झाल्याशिवाय कारखाने बंद करू नयेत अशा सूचना दिल्या आहेत. साताऱ्यात कृष्णा सहकारी, रेठरे (गाळप मेट्रिक टन) (११५०७७०), सह्याद्री सहकारी, कराड (१०५५४००), अजिंक्यतारा सहकारी,सातारा (६१२५०), श्रीराम सहकारी, फलटण (४८८८१०), बाळासाहेब देसाई पाटण (२२३७३०), रयत सहकारी (६७७६२०), गुरू कमोडिटी (जरांडेश्वर शुगर), कोरेगाव (१५५९२४०), शरयू एग्रो (९३५५९६), स्वराज इंडिया (७३१६८५), खटाव-माण तालुका एग्रो (६६९०५०), ग्रीन पॉवर शुगर, खटाव (५४८०४०), जयवंत शुगर,कराड (६४६२८०), दत्त इंडिया फलटण (४१२१६५) असे मिळून नोंदींत असणाऱ्या दीडशे टन उसापैकी ९४१९६३६ मेट्रिक टन उसाचे गाळप करून १०१५२१०० िक्वटल साखरेचे उत्पादन केले आहे. सर्व साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात नोंदीत व बिगर नोंदीत मिळून ६० लाख टन उसाचे ऊस शिल्लक आहे. उत्तर साताऱ्याच्या वाईतील पाच तालुक्यांचे कार्यक्षेत्र असणाऱ्या किसनवीर कारखाना बंद असल्याने या कारखान्याच्या कार्यक्षेत्रातही वाईला सात लाख मेट्रिक टन व खंडाळा येथे तीन लाख मेट्रिक टन ,कोरेगाव अडीच लाख, जावली दोन लाख मेट्रिक टन ऊस उभा आहे. अगोदरच ऊस शेतात वाळून गेला असून सर्व शिवारे पांढऱ्याशुभ्र तुऱ्यांनी भरलेली आहेत. टोळी धारकांच्या तोडणीच्या पैशाच्या मागण्या वाढत आहेत. शेतकऱ्यांची अडवणूक होत आहे .यामुळेच सहकार मंत्र्यांनी ऊस तोडणीचा वेग वाढविण्याच्या सूचना कारखानदारांना दिले आहेत. मात्र कारखानदारांनी याबाबत तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे.
सातारा जिल्ह्यात उसाचे उत्पादन वाढल्यामुळे ऊस गाळपाचा प्रश्न गंभीर आहे. त्यातच किसनवीर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रासह जिल्ह्यातील नोंदीत व बिगर नोंदीत शिल्लक ऊस तुटावा यासाठी साखर आयुक्तांना मी सूचना दिल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांशीही याबाबत चर्चा झाली आहे. शेतकऱ्यांनी अजिबात घाबरून जाऊ नये. लगतच्या सर्व कारखान्यांना तशा सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व उसाचे गाळप झाल्याशिवाय कारखाने बंद होऊ देणार नाही. -बाळासाहेब पाटील, सहकारमंत्री