वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षेत इंटरनेट कॅफेमधून ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर उदगीर येथील ७ विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. बनावट प्रवेशपत्र (हॉल तिकीट) दिल्यामुळे या विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहावे लागले.
गुरुवारी राज्यभरात वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षा घेण्यात आली. परीक्षेसाठी शहरातील दयानंद महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर एकाच क्रमांकाचे दोन विद्यार्थी आढळून आल्यामुळे परीक्षक गोंधळात पडले. सीईटी सेलच्या यंत्रणेतून चौकशी केली असता एका विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र बनावट असल्याचे आढळून आले. त्यानंतर त्याला परीक्षेस बसू दिले गेले नाही. उदगीर शहरातील उदयगिरी महाविद्यालयात ७ विद्यार्थ्यांच्या बाबतीत असा प्रकार घडला.
फसवणूक झालेल्या उदगीर येथील उमर चाऊस या विद्यार्थ्यांशी संपर्क केला असता त्याने परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरावे लागत होते व घरी संगणक नसल्यामुळे शहरातील नगर परिषद संकुलातील गॅलक्सी इंटरनेट कॅफेमध्ये जाऊन आपण ऑनलाईन अर्ज भरला. या अर्जासाठीचे शुल्कही तेथेच जमा केले. परीक्षेला जाण्यापूर्वी प्रवेशपत्र (हॉलतिकीट) या कॅफेवरून घेतले व लातूर येथे परीक्षा केंद्रावर गेलो असता आपले हॉलतिकीटच बनावट असल्याचे लक्षात आले. संबंधित इंटरनेट कॅफेने आपला अर्जच भरला नसावा व त्याचे पसे परस्पर वापरले असावेत. आपल्यासारख्याच एकूण ७ विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे सांगताना नीलेश बंडे, चक्रपाल वाघमारे, सय्यद उमर यांचीही फसवणूक झाल्याचा दावा चाऊस यांनी केला. ऑनलाईन अर्ज भरावे लागल्यामुळे व त्यात झालेल्या फसवणुकीमुळे आपली वर्षभराची मेहनत वाया गेल्याची खंतही त्याने व्यक्त केली.
वैद्यकीय प्रवेशपूर्वसारख्या महत्त्वपूर्ण परीक्षेत विद्यार्थ्यांची फसवणूक होत असेल तर त्यांनी दाद कोणाकडे मागायची? गॅलक्सी इंटरनेट कॅफे येथे उमर चाऊस व त्याच्या मित्रांनी गुरुवारी भेट दिली असता संबंधित व्यक्ती कॅफेत नसल्याचे आढळून आले. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ही परीक्षा होते. पोलीस अधीक्षक, माध्यमिक शिक्षणाधिकारी अशी मंडळी सदस्य असतात. विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर या यंत्रणेने कारवाई करावी व किमान यापुढे तरी अन्य विद्यार्थ्यांची फसवणूक होणार नाही याची दक्षता घेतली जावी, असेही चाऊस यांचे म्हणणे आहे.