मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर शनिवारी खालापूर टोलनाक्याजवळ ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांच्या गाडीला अपघात झाला. एका ट्रकला शबाना आझमी यांची कार मागून धडकली आणि हा अपघात घडला. मात्र या प्रकरणी ट्रकचालकाने खालापूर येथे कारचालक अमलेश कामतविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार रायगड पोलिसांनी कारचालकाविरोधात कलम २७९ आणि ३३७ आणि मोटार वाहन अधिनियम कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.

‘शबाना आझमी यांचा कारचालक वेगाने गाडी चालवत होता. त्यामुळे त्याच्या गाडीची ट्रकला धडक बसली. यामध्ये त्याचा बेजबाबदारपणा होता’, असं ट्रक चालकाचं म्हणणं आहे.

शबाना आझमी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरुन प्रवास करत असताना खालापूर टोलनाक्याजवळ त्यांच्या गाडीला अपघात झाला. यामध्ये त्या आणि कारचालक जखमी झाले. त्यांच्यावर कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शबाना आझमी यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.