कर्जत : राशीन येथे सोलर कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करणे, कामात कमिशन मागणे या प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही. आमदार रोहित पवार यांनी केवळ राजकीय द्वेषातून माझ्यावर पावसाळी अधिवेशनात बिनबुडाचे आरोप केले आहेत. आमदार पवार यांच्या उमेदवारीची प्रथम मागणी करणारा राजकीय पदाधिकारी मी आहे. त्या वेळी मी त्यांना गुंड प्रवृत्तीचा आणि खंडणीखोर वाटलो नाही, असे प्रतिपादन शहाजी राजेभोसले यांनी पत्रकार परिषदेत केले.
या वेळी शहाजी राजेभोसले म्हणाले, की मी आज विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्यासमवेत काम करीत आहे. विधानसभा निवडणुकीत मी राम शिंदे यांचा प्रचार केला. राम शिंदे यांच्यासोबत असल्यामुळेच रोहित पवार यांनी राग मनामध्ये धरून केवळ राजकीय द्वेषातून मला राजकीयदृष्ट्या बदनाम करण्याचा केविलवाणा प्रयत्न आमदार पवार यांनी केला. त्यांनी अधिवेशनात सभागृहात खंडणीखोर आणि गुंड प्रवृत्तीचा उल्लेख केला. वास्तविक पाहता त्यांच्या आमदारकीची मीच खासदार शरद पवार यांच्याकडे मागणी केली होती, याचा विसर त्यांना पडला असावा.
रोहित पवार यांनी १५ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप केला. ज्या व्यक्तीने माझ्यावर खोटी फिर्याद दाखल केली तो कंपनीचा वाहनचालक आहे. वाहनचालकाकडे १५ कोटी रुपये खंडणी कोणी मागू शकतो का, याची शहानिशा आमदार पवारांनी प्रथम करून नंतर सभागृहात बोलायला हवे होते. केवळ राजकीय आकसापोटी त्यांनी माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करायला लावला आणि सभापती राम शिंदे यांना बदनाम करण्याचे षड्यंत्र रचले. आमदार पवार केवळ राजकीय हेतू पुढे आणत बीड प्रकरणाशी त्याची तुलना करून खुनशी राजकारण करण्याचा डाव टाकत आहे. माझ्या जागेत काम सुरू असताना आम्हीच ते काम कसे बंद पाडू, याची जाणीव आमदार पवारांना नसल्याचे दुर्दैव वाटते.
आमदार पवारांनी माझ्या खोट्या प्रकरणात जेवढी तत्परता दाखवली. तेवढीच तत्परता शिंपोरा पुलाच्या प्रकरणात दाखवली असती, तर तेथील ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार केला असता. केवळ स्वार्थासाठी आणि राजकीय पोळी भाजण्यासाठी एवढा आटापिटा एका मोठ्या राजकीय माणसाने करणे उचित नाही. आम्ही जनतेसाठी काम करीत आहोत. आजपर्यंतचा इतिहास पाहून यापुढे बोलावे.- शहाजीराजे भोसले