नांदेड : शहीद जवानाच्या मुलीला इयत्ता दुसरीमध्ये एका नामांकित इंग्रजी शाळेने प्रवेश नाकारल्याचा प्रकार समोर आला आहे. या संदर्भात प्रवेशासाठी शिक्षण विभागाने पत्रही दिले होते. त्यानंतरही प्रवेश नाकारल्यामुळे सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे.

लोहा तालुक्यातील जानापुरी येथील शहीद जवान संभाजी कदम यांच्या पत्नीने मुलगी तेजस्विनी कदम हीस ग्यानमाता इंग्रजी माध्यमाच्या शाळेत इयत्ता दुसऱ्या वर्गात प्रवेश मिळावा यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी परभणी व जिल्हा सनिक कल्याण अधिकारी नांदेड यांच्याकडे १६ जानेवारी २०२० रोजी पत्र दिले होते. त्याची दखल घेऊन संबंधित विभागाने नांदेड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला पत्र पाठवले होते.

पत्राचा दाखला देत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने शहरातील इंग्रजी माध्यमाची शाळा असलेल्या ग्यानमाता विद्यालयाला प्रवेश देण्यासंबंधी सूचना दिली होती. त्या आशयाचे पत्रही संबंधित शाळेला पाठवल्यानंतर या शाळेने शहीद जवानाच्या पाल्याला प्रवेश नाकारला असल्याची माहिती प्राप्त होत आहे. याबाबत संबंधित शाळेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.